प्रतिनिधी /पेडणे
मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाला गोव्याचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव देण्याची पेडणे तालुक्मयातून जोरदार मागणी होत असली तरी, पेडणे तालुक्मयातील दोन्ही आमदारांनी मात्र मौन बाळगले असल्याने सध्या त्यांच्याबाबत प्रचंड नाराजी पसरली आहे. पेडणे मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर आणि मांदे मतदारसंघाचे मगो पक्षाचे आमदार जीत आरोलकर या दोन्ही आमदारांनी मौन बाळगले आहे.
मांदे मतदारसंघाचे मगो पक्षाचे आमदार जीत आरोलकर यांनी मोप विमानतळ नामकरणाबाबत मौन धारण करणे हे पेडणेतील तसेच गोव्यातील जनतेला आश्चर्यकारक वाटत आहे. भाऊसाहेब बांदोडकरांच्या मगो पक्षाच्या नावावर जीत आरोलकर हे आमदार म्हणून निवडून आले असून, त्यांनी तरी मुग गिळून गप्प राहणे हे कितपत योग्य आहे, असा खडा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
पेडणे मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांचा राजकीय प्रवास हा मगो पक्षातूनच सुरू झाला होता, हे त्यांनी विसरु नये, अशी प्रतिक्रिया तालुक्यात उमटली आहे. मगो पक्षाचे अनेक चाहते आणि भाऊसाहेब बांदोडकर यांना दैवत मानणारे अनेकजण आमदार प्रवीण आर्लेकर यांचे समर्थक असून आर्लेकर यांच्या या मौनामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. आगामी दिवसांत हे दोन्ही आमदार कोणती उघड भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.