निर्णायक फायनलमध्ये मलेशियाकडून 1-3 फरकाने एकतर्फी पराभव, वेटलिफ्टर लवप्रीत सिंगला कांस्य
बर्मिंगहम / वृत्तसंस्था
किदाम्बी श्रीकांतच्या अपयशी कामगिरीच्या पार्श्वभूमीवर भारताला राष्ट्रकुल मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये मलेशियाविरुद्ध 1-3 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. या निकालामुळे भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
श्रीकांतला त्याच्यापेक्षा निचांकी मानांकित त्झे योंग नी याच्याविरुद्ध तीन गेम्समध्ये पराभव पत्करावा लागला, ते आश्चर्याचे ठरले. श्रीकांतच्या याच पराभवामुळे विद्यमान विजेत्या भारतीय संघाला बॅकफूटवर जावे लागले.
प्रारंभी, पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रणकिरेड्डी व चिराग शेट्टी यांना पराभवाचा धक्का बसल्यानंतर भारताला पिछाडीवर जावे लागले. त्यानंतर महिला एकेरीत पीव्ही सिंधूने दमदार विजय मिळवत 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. मात्र, त्यानंतर किदाम्बी श्रीकांतने धक्कादायक पराभव पत्करल्याने भारताला पुन्हा पिछाडीवर जावे लागले. या विजयासह मलेशियाने सुवर्णपदक काबीज केले. 4 वर्षांपूर्वी गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत मलेशियाला भारताविरुद्धच पराभव पत्करावा लागला होता. त्याची त्यांनी येथे परतफेड केली.
भारताला येथे सुवर्ण कायम राखण्यासाठी पुरुष दुहेरीत रणकिरेड्डी व शेट्टी यांच्यावर अवलंबून राहणे भाग होते. महिला दुहेरी व मिश्र दुहेरीत भारतीय संघ कमकुवत असल्याने पुरुष दुहेरी व दोन एकेरी लढतीत विजय मिळवले तरच भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र, पुरुष दुहेरी व एका एकेरी लढतीत पराभवामुळे भारताचे मनसुबे उधळले गेले.
सलामीच्या दुहेरी लढतीत तेंग ऍरान चिया-वुई यिक सोह यांच्याविरुद्ध प्रदीर्घ रॅलीज रंगले. मात्र, रेड्डी व शेट्टी यांना त्यातील बहुतांशी रॅलीजमध्ये अपयशाचा सामना करावा लागला. मलेशियाच्या अल्ट्रा स्पीडसमोर त्यांचा फारसा टिकाव लागला नाही. मलेशियन जोडीने 21-18, 21-15 असा सहज विजय संपादन करत 1-0 अशी आघाडी मिळवली. महिला एकेरीत दोनवेळची ऑलिम्पिक चॅम्पियन पीव्ही सिंधूने 60 व्या मानांकित गोह जिन वेईचा 22-20, 21-17 असा पराभव केला. या दोन्ही गेम्समध्ये गोहने चीत होण्यापूर्वी सिंधूला झुंझार लढत दिली.
पुढे, 14 व्या मानांकित श्रीकांतला पुरुष एकेरीत 42 व्या मानांकित त्झे योंगविरुद्ध 21-19, 6-21, 21-16 फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीतील 11 वे मानांकित थिनाह मुरलीथरन व कूंग ले पीयर्ली तॅन या जोडीने निचांकी मानांकित गायत्री गोपीचंद व त्रिसा जॉली यांचा महिला दुहेरीत 21-18, 21-17 असा सहज धुव्वा उडवला आणि येथेच मलेशियाच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब झाले.
वेटलिफ्टर लवप्रीतला राष्ट्रकुल पदार्पणात कांस्य
भारताचा वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने आपल्या राष्ट्रकुल पदार्पणात पुरुषांच्या 109 किलोग्रॅम वजनगटात कांस्यपदकाची कमाई केली. लुधियानातील एका टेलरचा सुपुत्र असलेल्या 24 वर्षीय लवप्रीतने 355 किलोग्रॅमचे वैयक्तिक सर्वोत्तम लिफ्ट नोंदवत पोडियम फिनिश नोंदवला. यात क्लीन अँड जर्कमधील 192 किलोग्रॅम लिफ्टच्या नव्या राष्ट्रीय विक्रमाचा देखील समावेश राहिला.
संयमी लवप्रीतने स्नॅचमध्ये शेवटच्या प्रयत्नात अनुक्रमे 157 किलोग्रॅम व 163 किलोग्रॅम लिफ्ट नोंदवत कॅनेडियन प्रतिस्पर्धी बेसेट्टेसह संयुक्त दुसरे स्थान मिळवले होते. मात्र, नंतर प्रचंड चुरस रंगत असताना तो तिसऱया स्थानी फेकला गेला. कॅमेरुनच्या ज्युनियर नॅबेयूने 361 किलोग्रॅम लिफ्टसह सुवर्ण तर सामोआने 358 किलोग्रॅम लिफ्टसह रौप्य जिंकले.
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लवप्रीतला देखील अनेक कठीण परिस्थितीतून मार्ग काढावा लागला. मात्र, तरीही पालकांनी त्याच्या सरावात खंड पडू दिला नव्हता. या हेविवेट लिफ्टरने पुढे नौदलात सेवा स्वीकारली आणि त्याचे आयुष्य बदलून गेले. पुढे तो पतियाळातील राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरातही दाखल झाला. 2017 राष्ट्रकुल ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर त्याने त्याच वर्षी आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकावर देखील आपली मोहोर उमटवली. आता नॅशनल गेम्स हे आपले मुख्य लक्ष्य असेल, असे त्याने याप्रसंगी नमूद केले.
सीमा पुनिया पाचवी, नवजीत धिल्लाँ आठवी
भारतीय थाळाफेकपटू सीमा पुनिया व नवजीत कौर धिल्लाँ यांनी फायनलमध्ये अनुक्रमे पाचवे व आठवे स्थान मिळवत निराशा केली. यंदाचे राष्ट्रकुल शेवटचे ठरण्याची शक्यता असलेल्या 39 वर्षीय सीमा पुनियाने आपल्या दुसऱया प्रयत्नात 55.92 मीटर्सचा सर्वोत्तम थ्रो केला. मात्र, पोडियम फिनिशसाठी हे प्रयत्न पुरेसे ठरले नाहीत. पुनियाने सहभाग घेतलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत एकही पदक न जिंकता परतण्याची ही पहिलीच वेळ ठरली. यापूर्वी तिने 2006, 2014 व 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य तर दिल्ली 2010 राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. या हंगामातील तिची सर्वोत्तम कामगिरी 57.09 मीटर्स तर वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 64.84 मीटर्स इतकी आहे.
हंगामात 58.03 मीटर्स ही सर्वोत्तम कामगिरी असलेल्या नवजीत कौरने सहाव्या व शेवटच्या प्रयत्नात 53.51 मीटर्सचा निराशाजनक थ्रो करत अपेक्षाभंग केला. यापूर्वी 2018 गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत तिने कांस्य जिंकले होते. यंदा या इव्हेंटमध्ये नायजेरियाच्या चिओमाने 61.70 मीटर्स थ्रोसह सुवर्ण तर इंग्लंडच्या लॅलीने (58.42 मीटर्स) रौप्य जिंकले. आणखी एक नायजेरियन ऍथलिट अमॅएचीने 56.99 मीटर्स थ्रोसह कांस्यपदकाची कमाई केली.
नीतू, हुसामुद्दिन उपांत्य फेरीत, किमान पदक निश्चित
मुष्टियोद्धे हुसामुद्दिन मोहम्मद व नीतू गंगहास यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी आणखी दोन पदके निश्चित केली. मोहम्मदने पुरुषांच्या 57 किलोग्रॅम वजनगटात तर नीतूने महिलांच्या 48 किलोग्रॅम वजनगटात उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
निझामाबादचा 28 वर्षीय मोहम्मदने नामिबियाच्या ट्रायअगेन मॉर्निंगला 4-1 अशा फरकाने नमवले. दोनवेळची युवा सुवर्णजेती 21 वर्षीय नीतूला उत्तर आयरिश प्रतिस्पर्धी निकोल क्लायडेविरुद्ध विजयी घोषित करण्यात आले.
तुलिका मानची महिला 78 किलोग्रॅम ज्युडो फायनलमध्ये धडक
भारताच्या तुलिका मान हिने महिला ज्युडो 78 किलोग्रॅम वजनगटात अंतिम फेरीत धडक मारत आणखी एक पदक निश्चित केले. 22 वर्षीय, चार वेळची राष्ट्रीय चॅम्पियन तुलिकाला प्रारंभी पिछाडीवर जावे लागले होते. मात्र, नंतर तिने इप्पॉनच्या बळावर न्यूझीलंडच्या सिडनी ऍन्डय़्रूजवर मात केली. ही उपांत्य लढत अवघ्या तीन मिनिटात निकाली झाली. आता अंतिम फेरीत तिची लढत स्कॉटलंडच्या साराह ऍडलिंग्टनविरुद्ध होणार आहे. अन्य गटात पुरुषांच्या 100 किलोग्रॅम रिपेचेज इव्हेंटमध्ये दीपक देस्वालला फिजीच्या ताकावयाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
महिला हॉकीत भारताची कॅनडावर 3-2 फरकाने विजय
भारतीय महिला हॉकी संघाने निचांकी मानांकित कॅनडाला 3-2 अशा फरकाने नमवत राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. भारतीय संघाने सलिमा टेटे (तिसरे मिनिट) व नवनीत कौर (22 वे मिनिट) यांच्या गोलमुळे जोरदार सुरुवात केली. पण, ब्रिएने स्टेयर्स (23 वे मिनिट) व हन्नाह हॉन (39 वे मिनिट) यांनी काऊंटर ऍटॅक करत कॅनडाला बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर 51 व्या मिनिटाला लालरेमसियामीचा गोल निर्णायक ठरला. याच गोलच्या बळावर भारताने 3-2 फरकाने विजयश्रीवर शिक्कामोर्तब केले.
वेटलिफ्टर उषा बन्नूरला सहावे स्थान
महिलांच्या 87 किलोग्रॅम वेटलिफ्ंिटग इव्हेंटमध्ये भारतीय वेटलिफ्टर उषा बन्नूरला सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. बन्नूरला 205 किलोग्रॅम लिफ्ट नोंदवता आले. तिला स्नॅचमध्ये एकदा व क्लीन अँड जर्कमध्ये दोनवेळा क्लीन लिफ्ट नोंदवता आली नाही. 27 वर्षीय उषाचे दुहेरी अपयश पोडियम फिनिशच्या स्पर्धेतून बाहेर टाकले जाण्यासाठी कारणीभूत ठरले. ऑस्ट्रेलियन लिफ्टर इलिनने 255 किलोग्रॅम (110 व 145 किलो) वजन लिफ्ट करत सुवर्ण जिंकले. कॅनडाची लिफ्टर किर्स्टेकने 236 किलोग्रॅम (101 व 135 किलो) लिफ्टसह रौप्य तर नायजेरियाच्या मेरी तायवो ओसिजोने 225 किलोग्रॅम (102 व 123 किलोग्रॅम) लिफ्टसह कांस्य मिळवले.