वृत्तसंस्था/ बोगोटा (कोलंबिया)
येथे सुरू असलेल्या पुरुष आणि महिलांच्या विश्व वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताची अव्वल महिला वेटलिफ्टर मिराबाई चानूने 49 किलो वजनगटात मनगटाला दुखापत होऊनही रौप्यपदक मिळविले.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱया मिराबाई चानूने मंगळवारी रात्री येथे या स्पर्धेत मिराबाई चानूने 49 किलो वजनगटात स्नॅचमध्ये 87 तर क्लिन आणि जर्कमध्ये 113 असे एकूण 200 किलो वजन उचलत रौप्यपदक पटकाविले. चीनच्या जियांग हुईहुवाने स्नॅचमध्ये 93 तर क्लिन आणि जर्कमध्ये 113 असे एकूण 206 किलो वजन उचलत सुवर्णपदक मिळविले. चीनची महिला वेटलिफ्टर तसेच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती ओयु झिहुवाने या स्पर्धेत कांस्यपदक मिळवताना स्नॅचमध्ये 89 तर क्लिन आणि जर्कमध्ये 109 असे एकूण 198 किलो वजन उचलले. मिराबाई चानूने 2017 साली झालेल्या या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. गेल्या सप्टेंबरमध्ये सराव सत्रात चानूच्या मनगटाला दुखापत झाली होती. पण ती अद्याप पूर्ण बरी झालेली नाही. दुखापतीच्या अवस्थेत तिने गेल्या ऑक्टोबरमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तसेच त्यानंतर विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिराबाई चानूने सुवर्णपदक मिळविले होते. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेनंतर तिची बोगाटातील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धा आहे. 28 वषीय मिराबाई चानू आता ही दुखापत पूर्ण बरी करून घेण्यावर आपले लक्ष केंद्रित करेल. विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत स्पर्धा आयोजकांनी स्नॅच तसेच क्लिन आणि जर्कमधील विजेत्यांना स्वतंत्र पदके देण्याचा निर्णय घेतला आहे. बोगोटाच्या या स्पर्धेत महिला विभागात भारताच्या एस. बिंदियाराणी देवी (59 किलो), सी. ऋषिकांता सिंग (61 किलो), अचिंता शेहुली (73 किलो) आणि गुरुदीपसिंग (109 किलोवरील) गटात भाग घेत आहेत. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी बोगोटाची ही स्पर्धा पहिली पात्रतेची स्पर्धा आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये विश्व वेटलिफ्टिंग प्रकारात एकूण 14 वजनगट होते. पण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ते 10 राहतील.