फोर लोन बॉल्समध्येही रौप्यपदकाची कमाई, बॅडमिंटन, कुस्ती, टेटेमध्ये आगेकूच कायम
बर्मिंगहम / वृत्तसंस्था
येथील राष्ट्रकुल स्पर्धेत अविनाश साबळेने पुरुषांच्या 3 हजार मीटर्स स्टीपलचेस इव्हेंटमध्ये तर प्रियांका गोस्वामीने महिलांच्या 10 हजार मीटर्स रेस वॉकमध्ये भारताला रौप्य जिंकून दिले. प्रियांका गोस्वामी 10 हजार मीटर्स इव्हेंटमध्ये रौप्य जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.
या दोन रौप्यपदकासह भारतीय ऍथलेटिक्स पथकाने मिळवलेल्या पदकांची संख्या चारवर पोहोचली. भारतीय पथकाने यावेळी 2018 गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेच्या तुलनेत अधिक सरस कामगिरीही नोंदवली. 2018 मध्ये भारतीय ऍथलेटिक्स पथकाने 1 सुवर्ण, 1 रौप्य व 1 कांस्यपदक मिळवले होते. यंदा बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत यापूर्वी उंच उडीत तेजस्विन शंकर व लांब उडीत मुरली श्रीशंकर यांनी अनुक्रमे कांस्य व रौप्य जिंकले आहे.
27 वर्षीय अविनाश साबळेने 8 मिनिटे 11.20 सेकंद वेळेत आपला इव्हेंट पूर्ण करत असताना आपलाच 8 मिनिटे 12.48 सेकंद वेळेचा मागील राष्ट्रीय विक्रम देखील मागे टाकला. या इव्हेंटमध्ये केनियाच्या अब्राहम किबिवोतने (8 मिनिटे 11.15 सेकंद) सुवर्ण तर आणखी एक केनियन ऍथलिट ऍमोस सेरेमने (8 मिनिटे 16.83 सेकंद) कांस्यपदकाची कमाई केली. यापूर्वी मागील महिन्यात अमेरिकेत संपन्न झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये किबिवोतने 8 मिनिटे 28.95 सेकंद वेळ घेत सर्वांची निराशा केली होती. अगदी साबळेला देखील त्या स्पर्धेत 11 व्या स्थानी समाधान मानावे लागले होते. साबळेने त्या अपयशाची येथे पुरेपूर भरपाई केली.
बीड जिल्हय़ातील मांडवा खेडय़ातील रहिवासी असलेल्या साबळेने वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यजेत्या किप्रुतोला मागे टाकले, ते लक्षवेधी ठरले. केनियाच्या किप्रुतोने 8 मिनिटे 34.96 सेकंद अशी वेळ नोंदवली. लष्करी सेवेत कार्यरत असलेल्या साबळेने सियाचीनमध्ये सेवा बजावली असून मागील महिन्यात प्रतिष्ठेच्या डायमंड लीगमध्ये 8 मिनिटे 12.48 सेकंद अशी वेळ नोंदवली होती.
प्रियांकाची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी
महिला गटातील 10 हजार मीटर्स रेसवॉकमध्ये प्रियांकाने 43 मिनिटे 38.83 सेकंद अशी कारकिर्दीतील सर्वोत्तम वैयक्तिक वेळ नोंदवली. या इव्हेंटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जेमिमाने (42 मिनिटे 34.30 सेकंद) सुवर्ण तर केनियाच्या इमिली वॅम्युसी एन्गिईने (43 मिनिटे 50.86 सेकंद) कांस्यपदकाची कमाई केली. स्पर्धेत सहभागी अन्य स्पर्धकांमध्ये भावना जाटने 47 मिनिटे 14.43 सेकंद अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली असली तरी तिला आठव्या, शेवटच्या स्थानी समाधान मानावे लागले. रेस वॉकमध्ये हरमिंदर सिंगने 2010 दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत 20 किमी रेसवॉक इव्हेंटमध्ये पहिलेवहिले कांस्य जिंकले होते.
पीव्ही सिंधू महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत, कश्यपचे आव्हान संपुष्टात
दुहेरी ऑलिम्पिक पदकजेती पीव्ही सिंधूला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या गोह वेई जिन हिच्याविरुद्ध विजय मिळवण्यासाठी झगडावे लागले तर आकर्षी कश्यपचे राष्ट्रकुल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
माजी वर्ल्ड चॅम्पियन सिंधूने 60 व्या मानांकित गोहविरुद्ध 19-21, 21-14, 21-18 अशा फरकाने विजय मिळवला. राष्ट्रकुल स्पर्धेत तिने उपांत्य फेरीत धडक मारण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. आकर्षी कश्यपला राष्ट्रकुल पदार्पणात स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिल्मरविरुद्ध 10-21, 7-21 असा पराभव पत्करावा लागला. गिल्मर हिने 2014 मध्ये रौप्य तर 2018 मध्ये कांस्य जिंकले आहे. सध्या जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सिंधूने पहिला गेम गमवावा लागल्यानंतरही नंतरचे दोन्ही गेम लागोपाठ जिंकत आगेकूच केली.
विनेश फोगट, रवि दहिया, नवीन सुवर्णपदकासाठी लढणार
महिला गटात विनेश फोगट व पुरुष गटात रवि दहिया यांनी आपापल्या गटातून अंतिम लढतीतील स्थान निश्चित केले असून आता ते सुवर्णपदकासाठी लढतील. विनेशने कॅनडाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यजेत्या समंथ लेघ स्टीवर्टविरुद्ध अवघ्या 36 सेकंदात बाजी मारली, ते लक्षवेधी ठरले.
27 वर्षीय विनेशने त्यानंतर नायजेरियाच्या मर्सी ऍदेक्युरोयेला नमवले. महिला 53 किलोग्रॅम वजनगटात आता अंतिम लढतीत विनेश फोगटसमोर लंकेच्या मदुरावलगेचे आव्हान असेल. विनेश येथे सलग तिसऱया सुवर्णपदकासाठी प्रयत्नशील असणार आहे.
टोकियो ऑलिम्पिक रौप्यजेत्या रवि कुमार दहियाने न्यूझीलंडचा सूरज सिंग व पाकिस्तानचा असद अली यांच्यावर तांत्रिकदृष्टय़ा सरस खेळाच्या बळावर मात केली. आता पहिल्यावहिल्या राष्ट्रकुल सुवर्णपदकासाठी त्याची निर्णायक लढत नायजेरियाच्या इबिकेविन्मो वेल्सनविरुद्ध होणार आहे.
74 किलोग्रॅम वजनगटात नवीन कुमारने नायजेरियाचा जॉन, सिंगापूरचा हाँग ल्यू, इंग्लंडचा चार्ली जेम्स बॉलिंग यांना पराभूत करत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. तो आता अंतिम फेरीत पाकिस्तानच्या ताहीर मोहम्मद शरीफविरुद्ध लढत देईल.
महिलांच्या 50 किलोग्रॅम वजनगटात पूजा सिहागने स्कॉटलंडच्या ख्रिस्तेलेविरुद्ध विजय मिळवला तर कॅमेरुनच्या रेबेका मुआम्बोविरुद्ध तिला पुढे चाल मिळाली. शेवटच्या चारमध्ये मात्र कॅनडाच्या मॅडिसनविरुद्ध तिला 6-9 फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष फ्री स्टाईल 97 किलो गटात दीपक आता पाकिस्तानच्या रझाविरुद्ध कांस्यपदकासाठी लढणार आहे. भारताने कुस्तीत यापूर्वीच 6 पदके जिंकली असून त्यात 3 सुवर्णपदकांचा समावेश आहे.
फोर लॉन बॉल्समध्ये भारतीय संघाला रौप्य
बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेतील पुरुष गट फोर्स लॉन बॉल्स इव्हेंटमध्ये भारताने रौप्यपदक जिंकले. भारतीय संघाला अंतिम फेरीत उत्तर आयर्लंड संघाकडून 5-18 अशा फरकाने पराभव पत्करावा लागल्याने सुवर्णपदकाची संधी हुकली. भारतीय पथकात सुनील बहादूर (लीड), नवनीत सिंग (सेकंड), चंदन कुमार सिंग (थर्ड) व दिनेश कुमार (स्कीप) यांचा समावेश आहे. उत्तर आयर्लंडने यापूर्वी 1998 राष्ट्रकुल स्पर्धेतही लॉन बॉल्स सुवर्ण जिंकले होते. यंदा उपांत्य फेरीत भारताने यजमान इंग्लंडचा 13-12 अशा निसटत्या फरकाने पराभव करत किमान रौप्यपदक निश्चित केले होते.
शरथचे तिहेरी यश
राष्ट्रकुल स्पर्धेच्या नवव्या दिवशी, शनिवारी अचंता शरथ कमलने भाग घेतलेल्या तिन्ही इव्हेंट्समध्ये उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. विक्रमी नऊ वेळा राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेल्या शरथने आजवर 10 राष्ट्रकुल पदके जिंकली असून येथे त्याने पुरुष एकेरीत नायजेरियाच्या ओलाजिदेला 4-2 असे नमवले. त्यानंतर मिश्र गट व पुरुष दुहेरीतही उपांत्य फेरी गाठली.
मनिका बात्रा-दिया, स्रीजा-रिथ उपांत्यपूर्व फेरीत
मनिका बात्रा-दिया प्रयाग आणि स्रीजा अकुला-रिथ टॅनिसन यांनी टेटे इव्हेंटमध्ये उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. मनिका-दिया जोडीने हॉसेनली-नंदश्वरी या मॉरिशसच्या जोडीचा 3-0 असा पराभव केला. स्रीजा अकुला-रिथ यांनी वेल्सच्या ऍना-व्हिट्टो यांचाही 3-0 असा धुव्वा उडवला.
हिमा दासला अंतिम फेरी गाठण्यात अपयश
भारताची आघाडीची स्प्रिन्टर हिमा दासला महिलांच्या 200 मीटर्स इव्हेंटमधील अंतिम फेरीसाठी पात्र ठरता आले नाही. आसामच्या 22 वर्षीय हिमा दासने उपांत्य फेरीत 23.42 सेकंद वेळे नोंदवत तिसरे स्थान मिळवले होते. नामिबियाची ख्रिस्तिन व ऑस्ट्रेलियाची इला कॉनली यांनी अनुक्रमे 22.93 सेकंद व 23.41 सेकंद वेळेसह पात्रता मिळवली. हिमा दास कॉनलीपेक्षा अगदी किंचीत फरकाने मागे राहिली व यामुळे तिची अंतिम फेरीची संधी हुकली.
मुष्टियोद्धे नितू, अमित पांघलची अंतिम फेरीत धडक
भारतीय मुष्टियोद्धे अमित पांघलने (51 किलोग्रॅम) पुरुष गटात तर नितू गंगाजने (48 किलोग्रॅम) महिला गटात अंतिम फेरीत धडक मारत सुवर्णपदकासाठी आव्हान उभे केले. मागील राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य जिंकणाऱया अमित पांघलने झाम्बियाच्या पॅट्रिक चिन्येम्बाविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. महिला गटात नितूने कॅनडाच्या प्रियांका धिलाँनविरुद्ध सहज विजय मिळवला.