Tarun Bharat

तुलिकाला रौप्य, तेजस्विन शंकरला ऐतिहासिक कांस्य

Advertisements

बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेतील सहाव्या दिवशी भारताला 5 पदके, स्क्वॅशपटू सौरभ घोशालसह 4 भारतीयांची कांस्यपदकाची कमाई

वृत्तसंस्था /बर्मिंगहम

येथील राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय पथकाने 1 रौप्य व 4 कांस्य अशा एकूण 5 पदकांची कमाई केली. ज्युडोका तुलिका मान हिला महिलांच्या 78 किलोग्रॅम वजनगटात स्कॉटलंडच्या साराह ऍडलिंग्टनविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतासाठी ज्युडोतील हे तिसरे पदक ठरले. ऍथलिट तेजस्विन शंकरने पुरुषांच्या उंच उडी इव्हेंटमध्ये भारताला पहिलेवहिले पदक जिंकून दिले. त्यानंतर आघाडीचा स्क्वॅशपटू सौरव घोषाल, लवप्रीत सिंग, गुरदीप सिंग यांनीही कांस्यपदकाची कमाई केली.

निखत झरीन (50 किलो), नितू गंगहास (48 किलो) व मोहम्मद हुसामुद्दिन (57 किलोग्रॅम) यांनी आपापल्या गटात उपांत्य फेरीत स्थान मिळवत किमान पदक निश्चित केले. ऑलिम्पिक पदकजेती लवलिना बोर्गोहेनचे लाईट मिडलवेटमधील आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.

हॉकीमध्ये भारतीय महिला संघाने कॅनडाचा 3-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले तर पुरुष संघाने कॅनडाचा साखळी फेरीत 8-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला.

तुलिकाला फायनलमध्ये अपयश

भारतीय ज्युडोका तुलिका मानला महिलांच्या 78 किलोवरील वजनगटात स्कॉटलंडच्या साराह हिच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. वास्तविक, प्रारंभिक टप्प्यात तुलिकाने उत्तम वर्चस्व गाजवले होते. पण, नंतर ती अचानक पिछाडीवर फेकली गेली. साराहने इप्पॉनच्या बळावर सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. भारतासाठी ज्युडोमधील हे तिसरे पदक असून यापूर्वी सुशीला देवी व विकास यादव यांनी सोमवारी अनुक्रमे रौप्य व कांस्य जिंकले होते.

तेजस्विनचे ऐतिहासिक यश

दरम्यान, 23 वर्षीय तेजस्विन शंकरने पुरुषांच्या उंच उडी इव्हेंटमध्ये भारताला पहिलेवहिले पदक जिंकून दिले. त्याने पहिल्या प्रयत्नात 2.10 मीटर्सची उडी घेतली तर 2.15 मीटर्स हर्डल पहिल्या प्रयत्नात सहज पार केले. शंकरने नंतर 2.19 मीटर्स व 2.22 मीटर्सची उडी नोंदवत आपल्या कामगिरीत सातत्य राखले.

या गटात वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यजेता हमिश केरने 2.25 मीटर्सची झेप घेत सुवर्ण जिंकले तर ऑस्ट्रेलियाच्या विद्यमान विजेत्या ब्रेन्डॉन स्टार्कला मात्र सातत्य राखता आले नाही. क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी शंकरचे कांस्य सुवर्णापेक्षाही अधिक मोलाचे असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढले.

200 मीटर्स शर्यतीत हिमा दास उपांत्य फेरीत

भारताची स्टार स्प्रिन्टर हिमा दास हिने महिलांच्या 200 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. प्राथमिक फेरीत तिने 23.42 सेकंद वेळेत ही शर्यत पूर्ण करत आगेकूच केली.

22 वर्षीय हिमा दासने प्रारंभापासूनच 5 ऍथलिट्सच्या हिटमध्ये वर्चस्व कायम राखले होते. झाम्बियाच्या ऱहोडाने 23.85 सेकंद वेळेसह दुसरे स्थान तर युगांडाच्या जॅसेन्टने 24.07 सेकंद वेळेसह तिसरे स्थान मिळवले. 200 मीटर्स महिलांच्या इव्हेंटमध्ये सहा हिट बाकी असून पहिले 16 अव्वल ऍथलिट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

हिमाने दुसरी हिट जिंकली होती. पण, नायजेरियाची ओफिली (पहिल्या हिटमध्ये 22.71 सेकंद) व इलेन थॉम्पसन-हेराह (पाचव्या हिटमध्ये 22.80 सेकंद) यांनी हिमापेक्षा सरस वेळ नोंदवली. उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलेल्या स्पर्धकात 6 ऍथलिटने हिमापेक्षा सरस वेळ नोंदवली आहे.

हातोडाफेकीत मंजू बालाची अंतिम फेरीत धडक

महिलांच्या हातोडाफेक इव्हेंटमध्ये भारताच्या मंजू बालाने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले तर राष्ट्रीय सहकारी सरिता सिंगला पात्रता मिळवता आली नाही. 33 वर्षीय बालाने क्वॉलिफिकेशन राऊंडमध्ये 11 वे स्थान मिळवले. तिने आपल्या पहिल्या प्रयत्नात 59.68 मीटर्सचा सर्वेत्तम थ्रो नोंदवला. याच इव्हेंटमध्ये सरिताला मात्र यश आले नाही. तिचा सर्वोत्तम थ्रो 57.48 मीटर्स इतका राहिला आणि तिला यानंतर 13 व्या स्थानी समाधान मानावे लागले.

पात्रता फेरीतील कामगिरीनुसार, पहिले 12 अव्वल ऍथलिट फायनलसाठी पात्र ठरले. कॅनडाच्या कॅमरिन रॉजर्सने 74.68 मीटर्स थ्रो नोंदवला. या इव्हेंटमधील फायनल शनिवार दि. 6 रोजी होणार आहे.

सर्वोत्तम थ्रोसह अव्वल क्रमांकाने फानलमध्ये पोहोचली आहे.

सिंधू, श्रीकांतची बॅडमिंटन एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू व किदाम्बी श्रीकांत यांनी आपापल्या एकेरी गटात उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. दोनवेळची ऑलिम्पिक पदकजेती सिंधूने मालदीवच्या फातिमा अब्दुल रझाकला 21-4, 21-11 तर श्रीकांतने युगांडाच्या डॅनिएल वॅनागालियाचा 21-9, 21-9 अशा फरकाने फडशा पाडला.

अमित पांघल, निखत झरीन उपांत्य फेरीत, बोर्गोहेनचे आव्हान संपुष्टात

भारतीय मुष्टियोद्धे अमित पांघल व निखत झरीन यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवत किमान पदक निश्चित केले. अमित पांघलने आपल्या फ्लायवेट (48-51 किलोग्रॅम) उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या लेनॉन म्युलिगनचा पराभव केला. पांघलने यापूर्वी गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती.

26 वर्षीय निखत झरीनने महिलांच्या 50 किलोग्रॅम लाईट फ्लायवेट गटात वेल्सच्या हेलन जोन्सचा 5-0 असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत जोरदार धडक मारली. निखतप्रमाणेच नीतू गंगहास व 2018 राष्ट्रकुल कांस्यजेता मोहम्मद हुस्समुद्दिन यांनीही यंदा उपांत्य फेरीत धडक मारत किमान पदक निश्चित केले आहे. नीतू गंगहासने महिलांच्या 48 किलोग्रॅम मिनिमम वेट व मोहम्मदने पुरुषांच्या 57 किलोग्रॅम फिदरवेट गटात शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले.

लवलिना बोर्गोहेनला मात्र महिलांच्या 70 किलोग्रॅम लाईट मिडलवेट उपांत्यपूर्व फेरीत वेल्सच्या रॉसी इक्लेसविरुद्ध 2-3 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाने तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

Related Stories

लाल मातीचं ऑस्कर

datta jadhav

चीनचा उंचउडीपटू झँग गुवेईची अनपेक्षित निवृत्ती

Patil_p

मनोज तिवारीची नेमबाज होण्याची इच्छा

Patil_p

डोडिग-पोलसेक पुरुष दुहेरीत विजेते

Patil_p

ऑस्ट्रेलियन महिला संघाचा भारत दौरा

Patil_p

हैदराबादची अपयशाची शृंखला अखेर खंडित

Patil_p
error: Content is protected !!