दिवाळी 21 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पण मध्यप्रदेशमध्ये दहा दिवस आधीपासूनच दिवाळीचा उत्साह पहावयास मिळणार आहे. राज्यभरातील 25 हजारहून अधिक मंदिरांमध्ये दीपप्रज्वलन आणि भजन-कीर्तनाचा कार्यक्रम एकाचवेळी होणार आहे. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उज्जैन शहरात ‘महाकाल लोक’चे लोकार्पण करणार आहेत. 25 हजार मंदिरांमधील हा भजन-कीर्तन कार्यक्रम सोशल मीडियावर प्रसारित होणार असून कोटय़वधी लोकांना पाहता येणार आहे. हा उत्सव पाच दिवस चालणार आहे.
मध्यप्रदेशात 23 हजारहून अधिक सरकारी मंदिरे आणि विश्वस्त संस्था आहेत. 2 हजारहून अधिक मंदिरांचे क्यवस्थापन खासगी स्वरुपात चालते. या मंदिरांमध्ये 11 ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी 5 वाजता दीपप्रज्वलन केले जाणार आहे. त्यानंतर पूजाअर्चा आणि भजन-कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. मंदिरांच्या स्वच्छतेला आतापासूनच प्रारंभ करण्यात आला असून स्वच्छतेचे उत्तरदायित्व व्यवस्थापन समिती आणि पुरोहितांवर सोपविण्यात आले आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथील सर्व मंदिरांमध्ये स्क्रीन बसविण्यात येणार असून लक्षावधी लोकांना कार्यक्रम पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. दीपप्रज्वलनासमवेतच शंखनादही करण्यात येणार आहे. मंदिरांच्या सजावटीचे कार्यही केले जात असून ध्वज, भित्तीपत्रके इत्यादी लावण्याचे कार्य कार्यकर्ते स्वतःहून करीत आहेत. काही वॉट्सऍप ग्रुपवरूनही कार्यक्रमाचे दर्शन घडणार आहे. अशा तऱहेचा हा प्रथमच उपक्रम असून तो विक्रमी स्तरावर केला जाणार आहे.