प्रयागराज / नवी दिल्ली
भगवान श्रीकृष्ण यांच्या नगरीतील श्रीकृष्णजन्मस्थानसंबंधीची सर्व प्रकरणे एकाच वेळी चालवावीत आणि लवकरात लवकर निर्णय द्यावा, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरेतील न्यायालयाला दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाची तड त्वरेने लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकरणांची सुनावणी प्रतिदिन करण्याचा आदेश मथुरा येथील न्यायालयाला द्यावा अशी मागणी करणारी याचिका मनीष यादव यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात सादर केली होती. त्यावर निर्णय देताना न्या. सलील कुमार यांच्या न्यायालयाने हा आदेश गुरुवारी दिला.
मनीष यादव हे या प्रकरणातील हिंदू पक्षकार आहेत. विरुद्ध बाजूचे पक्षकार विनाकारण वेळकाढूपणा करीत आहेत, असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे सुनावणीच्या वेळी मुस्लीम पक्षकार उपस्थित राहिले नाहीत, तर त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती.
सर्वेक्षणाची मागणी मथुरेत कृष्णजन्मस्थानावरील मंदीर तोडून मशीद बांधण्यात आली आहे, याचे भरपूर पुरावे उपलब्ध आहेत. या मशिदीचे आणि परिसराचे सर्वेक्षण केल्यास सत्य बाहेर येईल. तेव्हा सुनावणीपूर्वी सर्वेक्षणाचा आदेश द्यावा अशी मागणी यादव यांनी केली आहे. सर्व सुनावणी उच्च न्यायालयाच्या अधिपत्यात व्हावी. हे प्रकरण संवेदनशील असल्याने सुनावणी लवकर करावी असे प्रतिपादन करण्यात आले.