मलेशिया ओपन बॅडमिंटन ः सायना नेहवाल पराभूत
वृत्तसंस्था/ कौलालंपूर
भारताचे बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू व पारुपल्ली कश्यप यांनी मलेशिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱया फेरीत प्रवेश केला तर सायना नेहवालचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले.
माजी वर्ल्ड चॅम्पियन असणाऱया सातव्या मानांकित सिंधूने शानदार प्रदर्शन करीत थायलंडच्या जागतिक दहाव्या मानांकित पॉर्नपोवी चोचुवांगचा 21-13, 21-17 असा पराभव केला. तिची पुढील लढत थायलंडच्या फितायापोर्न चैवानविरुद्ध होईल. 21 वर्षीय चैवान ही कनिष्ठ विभागात असताना जागतिक अग्रमानांकित होती. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळविलेल्या सायना नेहवालला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. झुंजार लढत देत ती अमेरिकेच्या 33 व्या मानांकित इरिस वांगकडून 11-21, 17-21 अशी पराभूत झाली.
पुरुष एकेरीत माजी राष्ट्रकुल चॅम्पियन पारुपल्ली कश्यपने दुखापतीनंतर पुनरागमन करताना कोरियाच्या हेओ क्वांगवर 21-12, 21-17 अशी मात केली. जागतिक क्रमवारीत 39 व्या स्थानावर असणाऱया कश्यपची पुढील लढत थायलंडच्या कुनलावत वितिदसर्नशी होईल. गेल्या मार्चमध्ये कुनलावतने जर्मन ओपन सुपर 300 स्पर्धा जिंकली होती.
मिश्र दुहेरीत बी.सुमीत रेड्डी व अश्विनी पोनप्पा यांना 21 व्या मानांकित हॉलंडच्या रॉबिन टेबलिंग व सेलेना पिएक यांच्याकडून 15-21, 21-19, 17-21 असा पराभव पत्करावा लागला.