वृत्तसंस्था/ बर्मिंगहम
बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू तसेच लक्ष्य सेन यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच लक्ष सेनने एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे.
महिला एकेरीच्या रविवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पी. व्ही. सिंधूने सिंगापूरच्या येओ जिया मिनचा 49 मिनिटांच्या कालावधीत 21-19, 21-17 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल केली आहे. सिंधूने सलग दुसऱयांदा राष्ट्रकुल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे.
पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात 10 व्या मानांकित लक्ष्य सेनने सिंगापूरच्या जीया हेंग तेहचा 21-10, 18-21, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. या उपांत्य लढतीत 20 वर्षीय लक्ष्य सेनने आपल्या क्रॉस स्मॅशवर अधिक भर दिला होता. या सामन्यात लक्ष्य सेनने पहिला गेम जिंकल्यानंतर सिंगापूरच्या तेहने दुसरा गेम जिंकून सामन्यात रंगत आणली. तिसरा गेम अटीतटीचा झाला पण लक्ष्य सेनने हा गेम फोरहँड स्मॅश फटक्यावर जिंकून अंतिम फेरीकडे वाटचाल केली.
श्रीजाचे कांस्य हुकले, श्रीकांत प्लेऑफमध्ये
महिला एकेरीच्या कांस्यपदक प्ले ऑफ लढतीत ऑस्ट्रेलियाच्या लियुने श्रीजा अकुलाचा 3-11, 11-6, 11-2, 7-11, 15-13, 9-11, 11-7 असा पराभव केला. हा सामना दीड तास चालला होता. पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत भारताच्या किदांबी श्रीकांतचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. मलेशियाच्या याँगने के. श्रीकांतचा 13-21, 21-16, 21-10 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता कांस्यपदकासाठी श्रीकांतचा सामना सिंगापूरच्या तेह बरोबर होणार आहे. पुरुष एकेरीत याँग आणि लक्ष्य सेन यांच्यात अंतिम फेरीचा सामना होईल.