आकर्षी, समीर, इशान-तनिषा यांचे पराभव
वृत्तसंस्था/ जकार्ता
भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू व लक्ष्य सेन यांनी येथे सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविणाऱया लक्ष्य सेनला येथे सातवे मानांकन मिळाले असून त्याने डेन्मार्कच्या हॅन्स क्रिस्टियन सोलबर्ग व्हिटिंगहसचा 21-10, 21-18 असा पराभव केला तर महिला एकेरीत सिंधूला विजयासाठी संघर्ष करावा लागला. तिने डेन्मार्कच्या लिने ख्रिस्तोफर्सनवर 18-21, 21-15, 21-11 अशी मात केली. 51 मिनिटे ही लढत रंगली होती. या दोघींमध्ये याआधी तीन लढती झाल्या होत्या आणि त्या सर्व सिंधूनेच जिंकल्या होत्या. सेनची पुढील लढत डेन्मार्कच्या रासमुस गेम्केशी तर सिंधूची दुसऱया फेरीची लढत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगशी होणार आहे.
अन्य सामन्यात आकर्षी कश्यपला अमेरिकेच्या बीवेन झँगकडून 12-21, 11-21 अशी हार पत्करावी लागली. दुखापतीतून बरा झाल्यानंतर पुनरागमन करणाऱया समीर वर्मालाही पराभवाला सामोरे जावे लागले. इंडोनेशियाच्या चिको ऑरा ड्वि वार्डोयोने त्याला 21-17, 21-15 असे हरविले. मिश्र दुहेरीत इशान भटनागर व तनिषा क्रॅस्टो यांना झुंजार लढतीनंतर पराभव स्वीकारावा लागला. इंडोनेशियाच्या चौथ्या मानांकित प्रवीण जॉर्डन व मेलाती दाएव्हा ओक्तावियांती यांनी त्यांच्यावर 14-21, 21-16, 12-21 अशी मात केली.