वृत्तसंस्था/ कौलालंपूर
2023 च्या बॅडमिंटन हंगामाला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. मलेशिया खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघाची भिस्त प्रामुख्याने पी. व्ही. सिंधू, एच. एस. प्रणॉय आणि लक्ष्य सेन यांच्या कामगिरीवर राहील. दुखापतीमुळे जवळपास पाच महिने बॅडमिंटन क्षेत्रापासून अलिप्त राहिलेल्या पी. व्ही. सिंधूचे या स्पर्धेत पुनरागमन होत आहे.
2022 चा बॅडमिंटन हंगाम भारतीय बॅडमिंटनपटूंना निश्चितच यशस्वी ठरला होता. आता 2023 च्या बॅडमिंटन हंगामात अधिक दर्जेदार कामगिरी करण्यासाठी भारतीय बॅडमिंटनपटू सज्ज झाले आहेत. आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या पात्रफेरीची स्पर्धा येत्या मे महिन्यात होणार आहे. मंगळवारपासून येथे सुरू होणाऱया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशनच्या सुपर 1000 तसेच 1250,000 डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत डेन्मार्कचा टॉप सीडेड व्हिक्टर ऍक्सेलसन, मलेशियाची लि झी जीया, जपानच्या अकाने यामागुची, त्याचप्रमाणे तेई झू यिंग या सीडेड खेळाडूंचा सहभाग राहणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरी पदक मिळविणाऱया पी. व्ही. सिंधूला घोटय़ाची दुखापत झाली होती. त्यामुळे तिने तब्बल पाच महिने या क्षेत्रापासून स्वतःला अलिप्त ठेवले. मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा सलामीचा सामना स्पेनची माजी विश्वविजेती कॅरोलिना मारीनशी होणार आहे. सिंधूने आपला शेवटचा सहभाग गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत केला होता. स्पेनची कॅरोलिना मारीन आणि पी. व्ही. सिंधू यांच्यात आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये 14 वेळा सामने झाले असून त्यात सिंधूने नऊवेळा तर मारीनने पाचवेळा विजय नोंदविले आहेत. अलीकडच्या कालावधीत मारीनने सलग तीन सामन्यांमध्ये सिंधूला पराभूत केले होते.
पुरुष एकेरीच्या विभागात भारताची भिस्त प्रामुख्याने एच. एस. प्रणॉय आणि लक्ष्य सेन यांच्यावर राहील. जागतिक पुरुष बॅडमिंटनपटूंच्या मानांकनात लक्ष्य सेन सध्या दहाव्या स्थानावर आहे. लक्ष्य सेन आणि एच. एस. प्रणॉय यांच्यात या स्पर्धेतील सलामीची लढत होणार आहे. माजी टॉप सीडेड किदाम्बी श्रीकांतचा सलामीचा सामना जपानच्या बिगर मानांकित निशिमोटोशी होणार आहे. या सामन्यात श्रीकांतने विजय मिळविल्यास त्याला पुढील फेरीमध्ये पाचव्या मानांकित ख्रिस्टीशी लढत द्यावी लागेल. पुरुष दुहेरीत भारताची पाचवी मानांकित जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना पहिल्या फेरीत दक्षिण कोरियाच्या गेयु आणि किम हो यांच्याशी गाठ पडणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तसेच इंडिया खुल्या आणि फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांनी दुहेरीतील अजिंक्मयपदे मिळविली आहेत. महिला एकेरीच्या विभागात या स्पर्धेत सायना नेहवाल, आकषी कश्यप आणि मालविका बनसोड भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. तसेच महिला दुहेरीत त्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, अश्विनी भट, शिखा गौतम या भारतीय महिला बॅडमिंटनपटू सहभागी झाल्या आहेत.