मलेशियन ओपन ः लक्ष्य सेनला नमवून प्रणॉय दुसऱया फेरीत
वृत्तसंस्था/ कौलालंपूर
मलेशिया ओपन 2023 चा दुसरा दिवस भारतासाठी संमिश्र यश देणारा ठरला. एच. एस. प्रणॉय आणि सात्विकसाईराज रान्कीरेड्डी-चिराग शेट्टी या जेडीने दुसऱया फेरीत प्रवेश केला, पण दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूला तिची कट्टर प्रतिस्पर्धी स्पेनच्या कॅरोलिना मारिनकडून पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला.
सिंधू दीर्घ दुखापतीनंतर या स्पर्धेतून बॅडमिंटन कोर्टवर परतली. तथापि कॅरोलिना मारिनने 21-12, 10-21, 21-15 असा विजय मिळवल्यामुळे तिला आपले पुनरागमन साजरे करता आले नाही. गेल्या वषी ऑगस्टमध्ये कॉमनवेल्थ खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकल्यापासून सिंधू दुखापतीमुळे खेळू शकली नव्हती. पण पाच महिन्यांनंतर परतल्यावर तिला पराभवाची चव चाखावी लागली.
सिंदूची सुरुवात चांगली झाली नाही आणि ती लय गमावल्यासारखी दिसली. या परिस्थितीत 2015 मध्ये मलेशिया ओपन जिंकलेल्या मरिनला पहिला गेम 21-12 असा जिंकण्यासाठी फक्त 16 मिनिटे लागली. पण दुसऱया गेममध्ये सिंधूने जोरदार पुनरागमन करताना 11-4 अशी आघाडी घेतली आणि पुढे तो गेमही जिंकला. निर्णायक तिसऱया गेममध्ये जोरदार चुरस पाहायला मिळून मरिन 11-7 अशी आघाडीवर गेल्यानंतर एकवेळ 14-9 व पुढे 16-11 अशी परिस्थिती झाली होती. मात्र सिंधूने केलेल्या चुका तिला महागात पडून शेवटी हा गेमही मरिनाच्या नावावर झाला.
अन्य खेळाडूंमध्ये मालविका बनसोडला दुसऱया मानांकित दक्षिण कोरियाच्या ऍन से यंगने सरळ सेटमध्ये पराभूत केले. 28 वर्षीय मालविका सध्या एकेरीत भारताची दुसऱया क्रमांकाची खेळाडू आहे. परंतु संपूर्ण सामन्यात तिला कोणताही प्रभाव पाडता आला नाही. सर्वांत मनोरंजक सामना एच. एस. प्रणॉय विरुद्ध लक्ष्य सेन हा होऊन तो प्रणॉयने शेवटी 22-24, 21-12, 21-18 असा जिंकला. लक्ष्य सेनने 8-4 अशी आघाडी घेत सामन्याची सुरुवात सकारात्मक केली होती. परंतु लवकरच प्रणॉयने ताबा मिळविल्यानंतर लक्ष्यने जोरदार पुनरागमन करत पहिला गेम जिंकला.
दुसऱया गेममध्ये लक्ष्य एक वेळ केवळ एका गुणाने (7-8) पिछाडीवर होता, परंतु प्रणॉयने मुसंडी मारल्यानंतर ही एकतर्फी लढत होण्याची चिन्हे दिसू लागली होती. असे असले, तरी लक्ष्यला काही संधी मिळाल्या होत्या, ज्यांचा तो फायदा घेऊ शकला नाही. अंतिम गेममध्ये लक्ष्य सेन 6-1 ने आघाडीवर राहूनही त्याला पकड कायम राखता आली नाही आणि हा गेम व सामनाही प्रणॉयकडे गेला. दुसरीकडे, संथ सुरुवातीनंतर उसळी घेत सात्विकसाईराज रान्किरेड्डी-चिराग शेट्टी जोडीने कोरियाच्या जोडीला 21-16, 21-13 असे सरळ गेम्समध्ये पराभूत केले.