प्रख्यात गायक आनंद भाटेंच्या गायनाची पर्वणी : रामनाथ मंगल कार्यालय, भाग्यनगर येथे कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी / बेळगाव
आर्ट्स सर्कल बेळगावतर्फे सालाबादप्रमाणे रविवार दि. 23 ऑक्टोबर रोजी पहाटे 6 वाजता दिवाळीनिमित्त प्रातःकालीन गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मैफल रामनाथ मंगल कार्यालय, पहिला क्रॉस, भाग्यनगर येथे सादर होईल. सदर मैफलीमध्ये सर्व रसिकांना प्रवेश खुला आहे. यावषी पं. आनंद भाटे यांच्या गायनाचा आनंद रसिकांना मिळणार आहे. त्यांच्याबरोबर तबल्यावर श्रीधर मांडे आणि संवादिनीवर मुकुंद गोरे हे कलाकार आहेत. कलाकारांचा परिचय पुढीलप्रमाणे….
आनंद भाटे
आनंद भाटे हे किराणा परंपरेतील नवीन पिढीतील अग्रगण्य कलाकार आहेत. त्यांनी बालपणापासूनच संगीताध्ययन सुरू केले आणि तेव्हापासून ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सादर करीत आहेत. महान शास्त्रीय गायक, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य होण्याचा बहुमान त्यांना लाभला आहे.
आनंद यांनी संपूर्ण भारतात आणि परदेशात शास्त्रीय गायन सादर केले आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सव, पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत समरोह इत्यादी अनेक प्रति÷ित संगीत संमेलनांचा त्यात समावेश आहे. ‘बालगंधर्व’ चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केले आहे आणि त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शास्त्रीय ख्याल गायकीपासून ते ठुमरी, नाटय़गीत आणि भजने, अभंग यासारखे उपशास्त्रीय संगीत सादर करण्यात त्यांचा हातखंडा आहे. ‘संगीत सौभद्र’ या संगीत नाटकात श्रीकृष्णाची भूमिका साकारून त्यांनी मराठी रंगभूमीवरही मोलाचे योगदान दिले आहे.
भाटेबुवा या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या आजोबांकडून संगीताचा वारसा त्यांना मिळाला. आनंद यांची संगीताची नैसर्गिक प्रतिभा अगदी लहान वयातच दिसून आली. ते कोणत्याही शिकवणीशिवाय हार्मोनियम वाजवू शकत होते. त्यांच्या वडिलांच्या आणि त्यांचे गुरु चंद्रशेखर देशपांडे यांच्या मार्गदर्शनामुळे आनंद लवकरच बालगंधर्वांसारख्या शैलीत नाटय़संगीत गाऊ लागले.
आनंद यांनी पंडित यशवंतराव मराठे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे पद्धतशीर प्रशिक्षणही सुरू केले. ख्याल गायकी शिकण्यास त्यांनी सुरुवात केली. किराणा घराण्याच्या आणखी एक दिग्गज गायिका हिराबाई बडोदेकर यांच्या घरी त्यांना गायनाच्या अनेक संधी मिळाल्या. त्यांनी आपल्या श्रोत्यांना नेहमीच प्रभावित केले.
1988 मध्ये महान गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्यत्व त्यांनी मिळविले. आनंद यांचे दीर्घकाळचे स्वप्न पूर्ण झाले असंच म्हटलं पाहिजे. भीमसेनजींच्या मार्गदर्शनाखाली, आनंद हे तरुण पिढीतील एक उल्लेखनीय ख्याल-गायक म्हणून उदयास आले. भारतीय शास्त्रीय संगीताची आणि विशेषतः किराणा गायकीची गौरवशाली परंपरा त्यांनी पुढे नेली आहे.
संगीतातील कारकिर्दीसोबतच आनंद यांची शैक्षणिक कारकीर्दही तशीच उज्ज्वल आहे. एसएससी आणि एचएससी या दोन्ही परीक्षांमध्ये ते गुणवत्ता यादीत आले आणि पुढे पुणे विद्यापीठातून बीई (इलेक्ट्रॉनिक्स) आणि एम. टेक (कॉम्प्यूटर सायन्स) केले. त्यांनी पुणे येथे झेन्सार टेक्नॉलॉजीजमध्ये टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. एक अभियंता आणि संगीतकार म्हणून आनंद यांची ओळख आहे.
श्रीधर मांडे
श्रीधर मांडे हे भारतातील प्रसिद्ध तबलावादक आहेत. कर्नाटकातील गदग येथील लक्ष्मेश्वर येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या दहाव्या वषी त्यांनी पं. गुरुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तबल्याच्या अभ्यासाला सुरुवात केली. गदगच्या वीरेश्वर पुण्याश्रमाचे पुट्टराज गवई, त्यानंतर हुबळीचे पं. वीरण्णा कामकर आणि आता पं. रघुनाथ नाकोड ह्यांचे मार्गदर्शन त्यांना लाभत आहे. ते एक राष्ट्रीय दर्जाचे तबला कलाकार आहेत. श्रीधर यांनी देशभर आणि परदेशात भरीव कामगिरी केली आहे.
श्रीधर हे बी-उच्च श्रेणीचे आकाशवाणी कलाकार आहेत. विविध खासगी आणि सरकारी पुरस्कार आणि प्रमाणपत्रे त्यांना मिळालेली आहेत. या यादीत प्रति÷ित ‘कुमार श्री’ पुरस्काराचा आणि भीमसेन जोशी युवा पुरस्काराचा समावेश आहे. श्रीधर पूर्णवेळ तबलावादक असण्याव्यतिरिक्त डॉ. गंगुबाई हनगल गुरुकुल ट्रस्ट, हुबळी येथे तबलाशिक्षक म्हणून देखील काम करतात. कर्नाटक विद्यापीठात अतिथी व्याख्याता म्हणून त्यांना आमंत्रित केलेले आहे.
मुकुंद गोरे
गोरे कुटुंबामध्ये मुकुंद गोरे यांची गाण्यातली चौथी पिढी आहे. त्यांचे ग्वाल्हेर गायकीचे शिक्षण पंडित विनायक बुवा काळे, ठाणे आणि बेळगावचे ताम्हणकर बुवा यांच्याकडे झाले. मुकुंद गोरे आकाशवाणीचे उच्च श्रेणीचे शास्त्रीय गायक आहेत. त्यांनी भारतात आणि भारताबाहेर जपान, फिनलँड आणि अमेरिकेत अनेक कार्यक्रम केले आहेत. गायनाबरोबरच ते उत्तम हार्मोनियम वादक आहेत. त्यांची मुलगी अश्विनी गोरे-देशपांडे हीदेखील त्यांची शिष्या आहे.