शक्तिप्रदर्शन करत पोहोचले सीबीआय मुख्यालयात : रात्री उशिरापर्यंत चौकशीच्या फेऱयात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली मद्य धोरण घोटाळय़ाप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सोमवारी दिवसभर चौकशी सुरू होती. सकाळी 11.15 वाजता ते सीबीआय कार्यालयात पोहोचले. त्यानंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या पहिल्या मजल्यावर नेण्यात आले. यावेळी एफआयआरमध्ये नाव असलेल्या इतर आरोपींशी त्यांच्या संबंधांबद्दल आणि छाप्यादरम्यान सापडलेल्या कागदपत्रांबाबत चौकशी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.
सीबीआयने समन्स जारी करत मनीष सिसोदिया यांना चौकशीसाठी मुख्यालयात हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी ते आपल्या समर्थकांकरवी ‘शक्तिप्रदर्शन’ करत सीबीआय कार्यालयात पोहोचले होते. याप्रसंगी केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात आंदोलन करणाऱया आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सीबीआय कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱयांवर पोलिसांनी कारवाई केली. कारवाई करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये खासदार संजय सिंह यांचाही समावेश आहे.
समर्थक रस्त्यावर
सिसोदिया यांनी चौकशीसाठी मुख्यालयात हजर होण्यापूर्वी आपचे कार्यालय आणि राजघाटावर पोहोचले होते. येथे त्यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन केले. तत्पूर्वी सिसोदिया घराबाहेर पडण्यापूर्वी पत्नीने त्यांचे औक्षण केले. तसेच त्यांनी मातोश्रींचेही आशीर्वाद घेतले. आपच्या नेत्यांची कोंडी करण्याचा तपास यंत्रणांचा डाव असून मी अटकेची तयारी केली आहे आणि मी बलिदान द्यायला तयार आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
केजरीवाल यांचा ‘ट्विट’रुपी संताप
सिसोदिया यांना गुजरात निवडणुकीचे निकाल 8 डिसेंबरला लागतील. तोपर्यंत तुरुंगात डांबले जाईल असे उपरोधित ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले होते. मनीष सिसोदिया प्रचारासाठी गुजरातला जाऊ नयेत यासाठी विरोधकांकडून वेगवेगळय़ा प्रकारे अडवणूक सुरू आहे. मात्र निवडणुकीचा प्रचार थांबणार नाही. गुजरातमधील प्रत्येक व्यक्ती आज ‘आप’चा प्रचार करत असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. सायंकाळच्या दरम्यान केजरीवाल यांनी पुन्हा एकदा ‘जेल के ताले टुटेंगे, मनीष सिसोदिया छुटेंगे’ असे ट्विट केले होते.
…ही ‘आप’ची नौटंकी : भाजप
मनीष सिसोदिया सीबीआय मुख्यालयात हजर होण्यापूर्वी आम आदमी पक्षाने केलेल्या आंदोलनप्रश्नी भाजपनेही कडक शब्दात टीका केली आहे. आप नौटंकी करत आहे. त्यांचा हा ‘जश्न-ए-भ्रष्टाचार’ आहे. सिसोदिया आपल्या समर्थकांसह रस्त्यावर मोकळय़ा गाडय़ांमध्ये घोषणाबाजी करताहेत यावरून ‘आप’ने भ्रष्टाचाराचा विश्वचषक जिंकल्याचे दर्शन घडवत असल्याचे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले.