जामिनासंबंधी आज पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली तसेच अन्य राज्यांमध्ये गाजत असलेल्या मद्यधोरण घोटाळय़ातील मुख्य आरोपी मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. ईडीने सिसोदिया यांना सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राऊस ऍव्हेन्यू न्यायालयात हजर केले. यावेळी झालेल्या युक्तिवादाअंती 3 एप्रिलपर्यंत कोठडी वाढवल्यानंतर विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी सिसोदिया यांच्या जामिनावर मंगळवारी, 21 मार्च रोजी सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले.
सध्या सीबीआय आणि ईडी दोन्ही तपास यंत्रणा मद्य धोरण घोटाळय़ाची चौकशी करत आहेत. सिसोदियांची चौकशी अद्यापही पूर्ण झालेली नसल्याने त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी ईडीने केली. दिल्लीच्या उपराज्यपालांनी या प्रकरणाची तक्रार केल्यावर सिसोदिया यांनी आपला फोन बदलला होता. परंतु तपास यंत्रणांना त्यांचा मोबाईल डेटा पुनर्प्राप्त केला. आता एजन्सी त्याच्या ईमेल आणि मोबाईल फोनवरून काढलेल्या डेटाचे विश्लेषण करत असल्याने अजूनही सिसोदिया यांची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले.