गुजरात दंगलीशी निगडित खटल्यांवरून अटकेत
@ वृत्तसंस्था / अहमदाबाद
तिस्ता सेटलवाड प्रकरणी तपासासाटी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. चार सदस्यीय या एसआयटीची स्थापना गुजरात पोलिसांकडून करण्यात आली आहे. एसआयटीत 3 आयपीएस अधिकारी तपास करणार आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त बी.सी. सोलंकी, पोलीस उपायुक्त चैतन्य मांडलिक, एटीएसचे उपमहानिरीक्षक दीपन भद्रन आणि एटीएसचे अधिकारी सुनील जोशी यांचा यात समावेश आहे.
अहमदाबाद गुन्हे शाखेत तिस्ता सेटलवाड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी शनिवारी गुजरात एटीएसने मुंबईतून तिस्ता यांना ताब्यात घेतले होते. सेटलवाड यांना एका एनजीओप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
माजी खासदार एहसान जाफरी हे 2002 च्या गुजरात दंगलीदरम्यान मारले गेले होते. याप्रकरणी त्यांच्या पत्नी जकिया जाफरी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने जकिया यांची याचिका फेटाळल्यावर आणि गुजरात दंगलीप्रकरणी निर्णय कायम ठेवल्यावर हा विषय पुन्हा तापला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना 2002 च्या दंगलीप्रकरणी देण्यात आलेली क्लीनचिट कायम ठेवली होती.
सेटलवाड यांचा उल्लेख
जकिया जाफरी यांच्या याचिकेत कुठलाच मुद्दा नसल्याचे न्यायायलाने म्हटले होते. एसआयटीचा अहवाल स्वीकार करण्याच्या गुजरातमधील न्यायदंडाधिकाऱयांचा 2012 मधील आदेश न्यायालयाने कायम ठेवला होता. तसेच याप्रकरणातील सह-याचिकाकर्त्या सेटलवाड यांनी जकिया यांच्या भावनांचे शोषण केल्याची टिप्पणी न्यायालयाने केली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर तिस्ता सेटलवाड, माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट आणि माजी आयपीएस आर.बी. श्रीकुमार यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. तिस्ता आणि श्रीकुमार यांना ताब्यात घेण्यात आले. तर संजीव भट्ट हे पूर्वीपासून तुरुंगात आहेत. श्रीकुमार यांना गांधीनगरमधून ताब्यात घेण्यात आले होते.