ब्रिजभूषण सिंग यांच्याकडून आरोपांचा इन्कार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधातील जंतरमंतरवरील कुस्तीपटूंच्या उपोषणाचा शुक्रवारी 20 वा दिवस होता. शुक्रवारी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आणि कारवाईचा अहवाल सादर केला. यावेळी तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच डब्ल्यूएफआयचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचेही जबाब नोंदवण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. विनोद तोमर हे दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्येही संशयित आरोपी आहेत.
कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून ब्रिजभूषण यांचा जबाब नोंदवण्यात आला असून काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. ब्रिजभूषण यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले. ब्रिजभूषण शरण सिंग यांनी आपल्या स्पष्टीकरणात काही व्हिडिओ पुरावे आणि मोबाईल डेटा तपासण्यास सांगितले आहे. एसआयटी ब्रिजभूषण यांची अधिक चौकशी करणार आहे. 4 महिला पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण दहा अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून पोलिसांचे पथक उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक आणि हरियाणा येथे जाऊन पुरावे गोळा करत आहे.