नॅश्नल टेस्टिंग एजन्सीच्या नियमानुसार 11 केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त
प्रतिनिधी/कोल्हापूर
नॅश्नल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)तर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देश पातळीवर घेण्यात येणारी नॅशनल एलिजीबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षा 6 हजार 825 पैकी 6 हजार 504 विद्यार्थ्यांनी दिली. ही परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5.20 या वेळेत कोल्हापूर जिल्हय़ातील 11 परीक्षा केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्तात झाली. कोरोनाच्या नियमांचे पालन म्हणून विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर पुरवण्यात आले, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी कोल्हापूर शहर समन्वयक शिल्पा कपूर यांनी दिली.
नीट परीक्षा कोल्हापुरातील पोतदार इंटरनॅशनल स्कूल, संजय घोडावत पॉलीटेक्निक, कोल्हापूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, विश्वकर्मा कॉमर्स ऍन्ड सायन्स कॉलेज, विबग्योर हायस्कूल, तात्यासाहेब कोरे इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग ऍन्ड टेक्नॉलॉजी, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सायबर कॉलेज, कमला कॉलेज या 11 केंद्रावर सुरळीत पार पडली. या परीक्षेला 720 गुणांसाठी 180 प्रश्न होते. यामध्ये भौतिकशास्त्र 45, रसायनशास्त्र 45, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र दोन्ही मिळून 90 गुण होते. प्रत्येक विषयाचे 45 प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवले. ही परीक्षा ओएमआर शीटवर घेण्यात आली. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, ऍडमिट कार्ड, स्वतःचा फोटो तपासूनच परीक्षा केंद्रात सोडण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी कॉलर नसलेला साधा शर्ट आणि पँट, तर मुलींनी सलवार कुर्ता आणि साधी चप्पल घातलेली होती. (एनटीए)तर्फे विद्यार्थ्यांना काळा बॉलपेन, मास्क, सॅनिटायझर, प्रत्येक वर्गात घडय़ाळ बसवण्यात आले होते. ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, मराठी, ओडीया, आसामी, बेंगाली, गुजराती, उर्दू, कानडी आदी 11 भाषांमध्ये होती. काही विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेला तर काही विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. दिव्यांग विद्यार्थ्यांना एक तास पाच मिनिटे वाढवून देण्यात आली. आधारकार्डवरून सुरूवातीला वाद झाला पण स्वतः (एनटीए)तर्फे आधार कार्डचे झेरॉक्स काढून देण्यात आले. तसेच 11 केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्यात आले असले तरी संपूर्ण परीक्षेचे व्हीडीओ शुटींग करण्यात आले.