खानापूर तालुक्यातील कामशीनकोप येथील दुर्घटना
प्रतिनिधी / खानापूर
सहावषीय बालकाचा विद्युतभारीत तारेच्या स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील कामसीनकोप येथे घडली. वरूण बसाप्पा कोलकार असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कामशीनकोप येथील वरूण बसाप्पा कोलकार हा सकाळी सात वाजता आपल्या परसात प्रातःर्विधीसाठी बाहेर गेला होता. शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे विद्युतभारीत तार तेथे तुटून पडली होती. या तारेवर वरुणचा पाय पडल्याने त्याला विजेचा जबरदस्त धक्का बसला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी खानापूरच्या सरकारी इस्पितळात आणण्यात आले. परंतू तेथेच त्याचा मृत्यू झाला.
खानापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गेल्या काही दिवसापासून तालुक्मयात जोरदार वादळी वारे व पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून विद्युतभारीत तारा तुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.