फ्रान्समधील एका युवकाने लॉटरीतील जॅकपॉट पटकावून सोळाशे कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र, ही कमाई स्वतःच्या व्यक्तिगत एन्जॉयमेंटसाठी उपयोगात आणण्याऐवजी त्याने ती सर्व रक्कम पर्यावरण संरक्षणासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या व्यक्तिगत आनंदापेक्षा पृथ्वीचे आयुष्य वाढणे महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे संरक्षण झाल्यासच पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे आयुष्य वाढू शकेल, असे प्रतिपादन त्याने केले. या युवकाचे नाव अद्याप घोषित करण्यात आलेले नाही.
प्रेंच लॉटरी कंपनीने या युवकाचे नाव ‘गाय’ असे घोषित केले आहे. मात्र, ते त्याचे खरे नाव नाही. सुरक्षेच्या कारणास्तव खरे नाव घोषित करण्यात आलेले नाही, असे स्पष्ट करण्यात आले. डिसेंबर 2020 मध्ये त्याने ही लॉटरी जिंकली होती. हा युरो मिलियन्स लॉटरीच्या इतिहासातील सर्वात मोठा जॅकपॉट होता. या लॉटरी कंपनीने ‘गाय’च्या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत केले आहे. पर्यावरणासाठी सोळाशे कोटी रुपयांचे दान करणारा हा युवक आता ऍलन मस्क आणि बेजोस यांच्यासारख्या पर्यावरणप्रेमी उद्योगपतींच्या रांगेत जाऊन बसला आहे.