देशातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुण्यात आहे. महाराष्ट्रातील या ज्योतिर्लिंगावर आसाम सरकारने प्रश्न उपस्थित केला आहे. यावरून वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग खरं नसल्याचे आसाम सरकारचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातील सहाव ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्य़ाचा दावा मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी केला आहे. तर आसाम पर्यटन विभागाने याबबात जाहिरातबाजी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील विरोधकांनी आसाम सरकारच्या दाव्यावर टीका केली आहे. आसाम सरकारचा हा वेडेपणा असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे. तर सुप्रिया सुळे, सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
इतिहासातील नोंदीप्रमाणे ते भीमा नदीच्या उगमाजवळ आहे. खेड तालुक्यात आहे. आसाम सरकारने स्वत:च हसू केलं आहे अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार म्हणाले की, सत्तेसाठी आसामला गेलेल्यांनी यावर बोलावं. सहावं ज्योतिर्लिंग भीमाशंकर आसामला आहे हे म्हणण चूक आहे. गुवाहाटीचा वापर ज्यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी केला. तेथील मुख्यमंत्र्यांशी अनेक वेळ घालवला. महाराष्ट्राच्या अस्मितेवर कोणी घाला घालू नये या घटनेचा आम्ही निषेध करतो असेही ते म्हणाले.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या,
घटनाबाह्य ED सरकार-आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती.तिथं तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती.त्याचवेळी तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना? अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही.भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय….!
सचिन सावंत ट्विट करत काय म्हणाले,
भाजपाला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचं आहे. १/२ केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे.आता भाजपच्या आसाम सरकारचा दावा आहे की भीमाशंकरचे सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये आहे. या अत्यंत आगाऊपणाच्या दाव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.२/२ शिंदे फडणवीस सरकारने तात्काळ भूमिका स्पष्ट करुन आसाममधील भाजप सरकारच्या या निंदनीय कृतीचा निषेध केला पाहिजे. भाजपाने केवळ महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्याच नव्हे तर तमाम भारतीयांच्या श्रद्धा, भावना दुखावल्या आहेत. भाजपाचा महाराष्ट्राबद्दलचा आकस सातत्याने दिसून येत असल्याचेही त्यांनी म्हटलयं.

