कब्र खोदून अवशेष चोरण्याचे प्रकार
ब्रिटनमध्ये सध्या हैराण करून सोडणाऱया घटना उघडकीस येत आहेत. तेथील दफनभूमी सध्या चोरांच्या निशाण्यावर आहेत. कब्र खोदून दफन करण्यात आलेल्या मृतदेहाची कवटी आणि हाडं चोरली जात आहेत. तसेच या अवशेषांची विक्री सोशल मीडिया साइट फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर करण्यात येत आहे. अलिकडच्या दिवसांमध्ये ऑनलाइन विक्रीसाठी कब्र तोडण्याच्या घटना वाढल्याचे एका चौकशीत दिसून आले आहे.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर या अवशेषांच्या खरेदीचे प्रकार पूर्वीच्या तुलनेत खूपच सोपे झाल्याने या घटना घडत आहेत. अवशेषांना ऑनलाइन खरेदी करताना ते कुठून आणले हे जाणून घेणे अवघड आहे. मागील काही वर्षांमध्ये मानवी अवशेष खरेदी करण्याचा प्रकार मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. या उत्पादनांची मागणी असल्याने पुरवठा वाढविण्याची गरज आहे, याचमुळे लोक हाडं मिळविण्यासाठी कब्रांमध्ये तोडफोड करत आहेत.
केवळ ब्रिटनच नव्हे तर अन्य देशांमध्येही अशाप्रकारच्या घटना वाढल्या आहेत. 2018 मध्ये केंटमध्ये सेंट लियोनार्ड्स चर्चमधून 21 कवटींची चोरी झाली होती. या कवटींना ऑनलाइन काळय़ा बाजारात विकले जाईल अशी भीती लोकांना वाटत होती.