प्रतिनिधी /वास्को
मांगोरहिलच्या सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळाचा सार्वजनिक गणपती आता सर्वधर्मियांचा गणेशोत्सव होऊ लागला आहे. अठरा वर्षापूर्वी एका मुस्लीम युवकाने सुरू केलेल्या या गणेशोत्सवात मुस्लीम व हिंदु बरोबरच शिख समाजानेही सहभाग घेतला आहे. शुक्रवारी दुपारी शिख समुहातर्फे त्यांच्या गुरूव्दारामध्ये सर्वधर्मिय गणेशभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
वरूणापुरी मांगोरहिल येथील मुख्य रत्याच्या बाजुलाच हनुमान देवस्थान असून त्याच छोटय़ाशा जागेत जवळच्याच वस्तीत राहणाऱया अल्ताफ बदामी या युवकाने अठरा वर्षांपूर्वी स्वता पुढाकार घेऊन हिंदु मुस्लीम युवकांच्या साहाय्याने येथे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. या ठिकाणी जागेअभावी थाटमाट करण्याची संधी नसल्याने हा गणेशोत्सव छोटय़ाप्रमाणात आणि साधेपणानेच साजरा होत असतो. या पाच दिवसांच्या गणेश उत्सवात हिंदु मुस्लीम व ख्रिश्चन युवकही सहभागी होत आलेले आहेत. आता शिख समुहाने या गणेश उत्सवाला हातभार लावणे सुरू केले आहे. या गणेश उत्सवाच्या बाजुलाच गुरूव्दारा असून आयोजकांच्या विनंतीनुसारच मांगोरहिलच्या या गुरूव्थ्दाराशी संबंधीत शिख बांधवानी या उत्सवात सहभागी व्हायचे हे पाऊल उचलले आहे. शुक्रवारी शिख समुहातर्फे गुरूव्दारामध्ये महाप्रसादाचे आयोजन केले होते. महाप्रसाद वाटण्यास शिख धर्मिय सहभागी झाले होते. सर्वधर्मिय गणेश भक्तांनी मोठय़ा पंक्तीने जमून या महाप्रसादाचा लाभ घेतला.
मांगोरहिलमध्ये अन्य दोन सार्वजनिक गणेशोत्सव आहेत. तसेच जवळपास असलेल्या वरूणापुरीतील नौदलाच्या वसाहतीतसुध्दा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, सर्वधर्मियांच्या सहभागामुळे या गणेशोत्सवाने वेगळेपण प्राप्त केले आहे. आपला गणपती हा मांगोरािहिलचा राजा असल्याची येथील कार्यकर्त्यांची भावना आहे.