रोख सवलतीसह आकर्षक इएमआयचा पर्याय ः विविध कंपन्यांची सवलतीची तयारी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मोबाइल वापरकर्त्यांना आपला जुना मोबाइल बदलायचा असेल तर एक त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. होय, येत्या काळात ग्राहकांना सवलतीच्या दरात स्मार्टफोन्स खरेदी करता येणार असल्याची माहिती आहे. उत्सवी काळात मोबाइल स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या जाणार आहेत, असे कळते.
बाजारातील विक्रेते व तज्ञांकडून याबाबत माहिती मिळाली आहे. ई-कॉमर्स स्तरावर व ऑफलाइन पातळीवर स्मार्टफोन्स सवलतीत उपलब्ध करण्यात येणार आहेत. कंपन्या आपल्याकडचा स्टॉक कमी करण्यासाठी हे पाऊल उचलणार असल्याचे समजते. येणाऱया उत्सवी काळात म्हणजेच जूननंतरच्या पुढच्या सहा महिन्यात कंपन्या स्मार्टफोन्सवर सवलत जाहीर करणार आहेत.
सहामाहीत कमी प्रतिसाद
गेले सहा महिने हे मोबाइल कंपन्यांना अडचणीचे गेले. यावर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात मोबाइल स्मार्टफोन्सना म्हणावा तसा अपेक्षीत प्रतिसाद न लाभल्याचे कारणही सवलत देण्यामागे सांगितले जात आहे. रोख सवलतीसह आकर्षक इएमआयचा पर्यायही ग्राहकांना मिळणार आहे.
चीनी कंपन्याही तयारीत
दुसरीकडे चीनमधील मोबाइल कंपन्यांनाही फोन्सच्या विक्रीची समस्या भेडसावताना दिसते आहे. त्यांना सध्या पूर्व युरोपमध्ये अपेक्षीत प्रतिसाद लाभत नसल्याने भारतात मोबाईल विक्री वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे समजते. यासाठी आकर्षक रोख सवलत स्मार्टफोन्सवर दिली जाऊ शकते, असेही काही तज्ञांचे म्हणणे आहे.