वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने मंगळवारी येथे घोषित केलेल्या महिलांच्या ताज्या वनडे मानांकनात फलंदाजांमध्ये भारताच्या स्मृती मानधनाने आपले आठवे स्थान कायम राखले आहे. तर भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी सहाव्या स्थानावर आहे.
25 वर्षीय स्मृती मानधनाने 2022 च्या क्रिकेट हंगामातील आतापर्यंत झालेल्या 9 वनडे सामन्यांत 411 धावा जमविल्या असून त्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. फलंदाजांच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची ऍलीसा हिली पहिल्या स्थानावर असून इंग्लंडची स्किव्हेर दुसऱया स्थानावर आहे. गोलंदाजांमध्ये 39 वर्षीय झुलन गोस्वामीने चालू वर्षीच्या क्रिकेट हंगामात 9 वनडे सामन्यांत 12 गडी बाद केले आहेत. झुलनचे मानांकनातील स्थान एका अंकाने घसरले असून ती सध्या सहाव्या स्थानावर आहे. या यादीत इंग्लंडची इक्लेस्टोन पहिल्या तर दक्षिण आफ्रिकेची जोनासेन दुसऱया स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या मानांकन यादीत भारताची दिप्ती शर्मा सातव्या स्थानावर आहे.