पुणे / प्रतिनिधी :
Smuggling fake notes from Bangladesh, three arrested in Pune बांग्लादेशातून बनावट नोटा आणून तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) अटक केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा खडकी बाजार परिसरात ही कारवाई करण्यात आली.
अतुलकुमार नरेशकुमार मिश्रा (वय 23, रा. शेवाळे टॉवर्स, खडकी बाजार), रवी उर्फ सूरज वीरेंद्र शुक्ला (वय 35, रा. नवा बाजार, खडकी), राजूलकुमार उर्फ गुड्डू भाई राजबहाद्दूर सेन (वय 46, रा. लेक व्ह्यू सिटी, लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
अधिक वाचा : परतीचा मान्सून महाराष्ट्रातून लवकरच माघारी
मिळालेल्या माहितीनुसार, बनावट नोटा चलनात आणणाऱ्या तीन आरोपींची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पुणे प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून खडकी परिसरात एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून भारतीय चलनातील 500 रुपये मूल्याच्या 400 नोटा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी त्याला मदत करणाऱ्या आणखी दोघांना अटक करण्यात आली. तस्करीच्या बनावट भारतीय चलनी नोटा बाळगल्याप्रकरणी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान, बांग्लादेशच्या बॉर्डरवरून 2 लाखांच्या बनावट नोटा 26 हजार देऊन घेतल्या असल्याचे आरोपी गुड्डू याने सांगितले. आवश्यकता असेल, तेव्हा गुड्डू बांग्लादेश बॉर्डरवरील लोकांशी संपर्क साधून बनावट नोटा तस्करी करून भारतात आणत होता. तशी कबुली त्याने दिली असून, तोच या मागचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले आहे.