वृत्तसंस्था/ कोलकाता
बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी स्नेहाशिष गांगुलीची बिनविरोध निवड करण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्षपदासाठी यापूर्वी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरभ गांगुलीने आपला अर्ज दाखल केला होता.
सौरभ गांगुली यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने स्नेहाशिष गांगुलीची या पदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. स्नेहाशिष हे सौरभचे बंधू आहेत. सौरभ गांगुली हे पश्चिम बंगाल क्रिकेट संघटनेच्या प्रशासकीय विभागामध्ये नसले तरी त्यांचा पूर्वीप्रमाणेच भविष्यकाळातही संघटनेला नेहमीच पाठिंबा राहील, असे स्पष्टीकरण स्नेहाशिष गांगुली यांनी दिले आहे. चार दिवसांपूर्वी सौरभ गांगुली यांनी आपण बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा केली होती. पण त्यानंतर गेल्या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये बऱयाच घडामोडी घडल्या आणि त्यामुळे सौरभ गांगुली यांनी संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले.
बंगाल क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणी मंडळामध्ये आता स्नेहाशिष गांगुली अध्यक्ष, ए. विश्वास उपाध्यक्ष, नरेश ओझा मानद सचिव, पी. चक्रवर्ती मानद खजिनदार आणि डी. दास संयुक्त सचिव म्हणून काम पाहतील.