अडचणीत सापडलेल्या व्यक्तीची कधीही चेष्टा करु नये, असा संस्कार आहे. शक्यतर अशा व्यक्तीला साहाय्य करावे आणि तिला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. ते करता येणे शक्य नसल्यास निदान तिची मजा पाहू नये. चेष्टा किंवा मस्करी तर मुळीच करु नये, कारण आपल्यावरही केव्हा कशी वेळ येईल, ते सांगता येत नाही. म्हणून सभ्यतेचा संस्कार सोडू नये असे बजावले जाते.
कारा सेंटोरेली नामक एक गाजलेली टिकटॉक स्टार होती. कार अपघातात जखमी किंवा ठार झालेल्यांची चेष्टा ती तिच्या टिकटॉक शो मधून उडवत असे. हा जणू तिचा एक विकृत छंदच बनला होता. कोणत्याही अपघाताचे वृत्त तिला समजले की ती तिच्या टिकटॉक दृष्यातून अपघातात सापडलेल्यांची चेष्टा करुन त्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचे काम करीत असे. अनेकांनी तिला असा निर्दय आणि क्रूर स्वभाव सोडण्याविषयी सांगून पाहिले. पण तिने कोणाचेच ऐकले नाही. पण शेवटी एक दिवस तिचेच दिवस भरले. आपला कधीही अपघात झालेला नाही, अशी फुशारकी तिने काही दिवसांपूर्वीच मारली होती. पण हा टिकटॉक व्हिडीओ पोस्ट केल्यापासून सहा दिवसांनी तिच्याच कारचा भीषण अपघात झाला आणि त्यात दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त लोकांची ती जेव्हा चेष्टा करीत असे, तेव्हा लोकांना तिचा राग येत असे. पण आता तिचाच मृत्यू कार अपघातात झाल्याने तिचे चाहते हळहळले आहेत. तिच्या मृत्यूवर त्यांनी दुःख व्यक्त करणाऱया पोस्ट टाकल्या आहेत. तिच्यावरचा राग आता ते विसरले आहेत.