ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आजच्या सामनातील अग्रलेखात बेरोजगारी, जीडीपी, देशावरील आर्थिक संकट आदी मुद्यांवरून भाजपवर टीका करण्यात आली आहे. ही टीका करताना शिवसेनेकडून भाजपला ‘कमळाबाई’ असं हिणवण्यात आलं आहे. यापूर्वीही शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी भाजपला कमळाबाई म्हणून हिणवलं होतं. त्यावरुन मुंबई भाजप अध्यक्ष अशिष शेलार यांनी एका पत्रातून सामनातील कमळाबाईच्या उल्लेखाला उत्तर देत सेनेला संतप्त सवाल केला आहे.
शेलार यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, आमच्या कमळाला हिणवायला ‘बाई’ म्हणताय? हरकत नाही. मात्र, बाईमध्ये आई, ताईमध्ये कडक लक्ष्मी पण आहे. त्यामुळे तुमच्यातल्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही पेंग्विन सेना म्हणायचं का? असा प्रश्न शेलारांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. तसेच ता.क. असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत!, असेही त्यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा : राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द करा; मुख्यमंत्री शिंदेंची राज्यपालांकडे मागणी
झारखंड, दिल्लीमध्ये ‘ऑपरेशन लोटस’चा प्रयत्न फसल्यानंतर भाजप अर्थात कमळाबाईची वाईट नजर आता कॉँग्रेसवर पडली आहे. पक्षांतर्गत नाराजीचा फायदा घेत महाराष्ट्रात कॉँग्रेसमध्ये फूट पाडण्याची ‘हात’घाई भाजपकडून सुरू आहे, असे ‘सामना’मध्ये म्हटले आहे. यावरुनच भाजप-शिवसेनेत जुंपली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही दोन्ही पक्षातील सुरूवात असून अद्याप पिक्चर बाकी असल्याचं बोलल जात आहे.