सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल ः दिल्लीत अधिकाऱयांवर केंद सरकारचे नियंत्रण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयात दिल्लीतील अधिकाऱयांची बदली तसेच नियुक्तीवरील प्रशासकीय नियंत्रणाप्रकरणी सुनावणी झाली आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिल्लीत निवडून आलेल्या सरकारच्या आवश्यकतेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. दिल्लीचे प्रशासकीय नियंत्रण केंद्र सरकारकडे असताना निवडून आलेले सरकार असण्याचा अर्थच काय अशी विचारणा न्यायालयाने केंद्राला केली आहे.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने सेवांवरील नियंत्रणासंबंधी केंद्र-दिल्ली सरकारमधील वादावर सुनावणी केली आहे. दिल्लीसारखा केंद्रशासित प्रदेश संघाचा एक विस्तार असून केंद्र सरकार स्वतःच्या अधिकाऱयांद्वारे तो प्रशासित करत असल्याचा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला. यावर न्यायालयाने दिल्लीत सर्वकाही केंद्राच्या म्हणण्यानुसार चालत असेल तर तर निवडून आलेल्या सरकारचा काय लाभ अशी विचारणा केली.
सुनावणीदरम्यान न्यायाधीश एम.आर. शाह, कृष्ण मुरारी, हिमा कोहली आणि पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकार कायदा निर्माण करण्यास अक्षम असलेल्या विषयांचा उल्लेख केला. तसेच राष्ट्रीय राजधानीतील सेवांच्या नियंत्रणासंबंधी कायदेशीर आणि घटनात्मक स्थितीबद्दल विचारणा केली आहे.
राष्ट्रीय राजधानी असल्याने दिल्लीला एक अद्वितीय दर्जा असून तेथे राहणाऱया सर्व राज्यांच्या नागरिकांमध्ये आपलेपणाची भावना असायला हवी. दिल्ली एक महानगरीय शहर असून लघू भारत असल्याचे सॉलिसिटर जनरल मेहता यांनी एका निर्णयाचा दाखला देत म्हटले आहे.
प्रशासकीय सेवा केंद्राने नियंत्रित करण्यासाठीची आवश्यकता मेहता यांनी उदाहरणासह व्यक्त केली आहे. केंद्र सरकार एका अधिकाऱयाला नियुक्त करत असेल आणि दिल्ली सरकारच्या एका धोरणानुसार तो अन्य राज्यासोबत असहकार्य करत असल्यास समस्या होईल असे मेहता यांनी नमूद केले आहे.
याचबरोबर एखाद्या अधिकाऱयासंबंधी विनंती केल्यावर उपराज्यपाल कारवाई करतात. अखिल भारतीय अधिनियम आणि युपीएससीकडून आयोजित परीक्षांच्या माध्यमातून अधिकाऱयांची नियुक्ती केली जाते. केंद्रशासित प्रदेशासाठी स्वतंत्र कॅडर नाही. केंद्रशासित प्रदेशात कुठलाच लोकसेवा आयोग नसल्याचे सॉलिसिटर जनरल मेहता यांच्याकडून घटनापीठाच्या निदर्शनास आणून दिले गेले. याप्रकरणी आता पुढील सुनावणी 17 जानेवारीला होणार आहे.