कुर्डुवाडी/प्रतिनिधी
पहाटे फिरायला गेलेल्या इसमाचा अज्ञात कारणामुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. २८ रोजी कुर्डुवाडी – करमाळा रोडवर पेट्रोलपंपाजवळ शिवार रस्त्यावर घडली. गोवर्धन बाबासाहेब शिंदे रा.शिवप्रतिष्ठान नगर कुर्डुवाडी ता.माढा असे मयत इसमाचे नाव आहे.
याबाबत मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मुलगा अक्षय गोवर्धन शिंदे याच्या तक्रारीवरून कुर्डुवाडी पोलिसांत नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की खबर देणाऱ्या अक्षय शिंदे यांचे वडिल गोवर्धन शिंदे हे नेहमीप्रमाणे पहाटे ५ वा. सुमारास फिरायला जाऊन सकाळी ७ पर्यंत घरी येतात परंतू शनिवार दि.२८ रोजी पहाटे ५ वा. फिरायला गेलेले परत आलेच नाहीत. त्यामुळे ते ज्या भागात फिरायला जातात त्या भागात शोध घेतला असता कुर्डुवाडी – करमाळा रोड येथील पेट्रोलपंपाजवळ शिवार रस्त्यावर कोणीतरी अज्ञात इसम पडला होता. त्यास अम्ब्युलन्सने सरकारी दवाखाना कुर्डुवाडी येथे घेऊन गेले. मुलगा अक्षय याने जाऊन पाहिले असता त्याचे वडील गोवर्धन शिंदे हेच होते. मृत्यूचे कारण मात्र समजू शकले नाही