मराठी टीचर्स टेनिंग कॉलेजतर्फे आयोजित सत्कारप्रसंगी किरण ठाकुर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षणाची पातळी वाढवायची असल्यास अंगणवाडी जोडून त्यामध्ये नवीन कोर्सेस सुरू केले पाहिजेत. मराठी टीचर्स टेनिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन आज हजारो विद्यार्थी बाहेर पडले आहेत. एक शिक्षक हजारो विद्यार्थ्यांना घडवितो आणि त्यातूनच एक चांगला समाज घडतो. असे उद्गार बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचे चेअरमन किरण ठाकुर यांनी काढले.
मराठी टीचर्स टेनिंग कॉलेज टिळकवाडी आणि माजी विद्यार्थी संघटनेतर्फे शुक्रवारी संस्थेच्या व्यवस्थापकांचा आणि डीएड् प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम हेरवाडकर स्कूलच्या सभागृहात झाला. यावेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे अध्यक्ष प्रा. एस. वाय. प्रभू, सहसचिव ज्ञानेश कलघटगी, प्राचार्य एम. बी. हुंदरे आदी उपस्थित होते.
शिक्षकांची गरज भासू लागल्याने टीचर्स टेनिंग कॉलेजची स्थापना
किरण ठाकुर पुढे म्हणाले, ग्रामीण भागात शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी 1937-1942 या काळात खेडोपाडी फिरून शाळा काढल्या गेल्या. दरम्यान, या शाळांमध्ये शिक्षकांची गरज भासू लागली. त्यामुळे 1942 ला मराठी टीचर्स टेनिंग कॉलेजची स्थापना झाली. या कॉलेजमध्ये हजारो शिक्षकांनी प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याबरोबर समाज घडविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. आज देशात अशिक्षितांची संख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत शिक्षण चळवळ अधिक तीव्र झाली पाहिजे. शिवाय यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे, मराठी टीचर्स टेनिंग कॉलेजचे नाव देशात आहे. मात्र मध्यंतरी या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटली होती. आता पुन्हा वाढली असून कॉलेजला ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आणि शिबिरे घेऊन कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असेही
त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षकांवर
यावेळी एस. वाय. प्रभू म्हणाले, आपला देश तरुणांचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. यांना घडविण्याचे काम शिक्षकांवर आहे. अशा भावी शिक्षकांना घडविण्याचे कार्य मराठी टीचर्स टेनिंग कॉलेजमध्ये केले जाते. बदलत्या काळानुसार शिक्षणात आमुलाग्र बदल करून नवीन पिढीला शिक्षण देणे आवश्यक आहे.
यावेळी संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल किरण ठाकुर यांचा शाल, फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याबरोबर डीएड प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचेदेखील स्वागत करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन व दीपप्रज्वलन झाले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत कॉलेजच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. तसेच यावेळी प्रा. निलेश शिंदे, संजय मगदूम, अपर्णा झिपरे यासह माजी विद्यार्थिनी आणि डीएड प्रशिक्षणार्थिनीदेखील मनोगत व्यक्त केले. प्रारंभी प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. प्राचार्य एम. बी. हुंदरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्रा. शंकर गावडे, प्रा. लता अडूरकर, प्रा. पी. बी. पाटील, प्रा. मयूर गाडगीळ, पी. एल. सडेकर यांच्यासह माजी विद्यार्थी, शिक्षक, निवृत्त शिक्षक, प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन ईश्वर पाटील यांनी केले. प्रा. एस. एन. गोल्याळकर यांनी आभार मानले.