गुन्हे शाखेच्या पथकाकडून पाच दुचाकी हस्तगत
प्रतिनिधी/ सोलापूर
परिस्थितीने गांजलेल्या व्यक्तीने नादुरुस्त दुचाकीच्या दुरुस्तीकरिता पैसे नसल्याने शहरातून पाच दुचाकी चोरल्या. सोलापूर रुग्णालय, पोलीस हेडक्वार्टर व गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून त्यातील एक दुचाकी पोलिसांची असल्याचे तपासात समोर आले आहे.
हणमंतु कुमर्या नागापागोलू (वय 40, रा. सरस्वती चौक) असे चोरटय़ाचे नाव आहे. मिस्त्राrचे काम करणाऱया हणमंतुने साधारण एक महिन्यात पाच दुचाकी चोरल्या. सुमारे महिन्याभरापूर्वी हणमंतुची दुचाकी रस्त्यावर बंद पडली. परंतु तिच्या दुरुस्तीकरिता खिशात पैसे नव्हते. त्याने शक्कल लढवित तेथीलच दुसरी दुचाकी पळविली. काही दिवस ती वापरली. त्यानंतर दुसरी दुचाकी चोरली. यापद्धतीने त्याने पाचही दुचाकी चोरल्या. जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोलापूर रुग्णालय परिसरातून त्याने चार दुचाकी पळविल्या. त्यानंतर गणेशोत्सव मिरवणुकीवेळी एक दुचाकी चोरली. मिरवणूक काळात चोरलेली दुचाकी पोलिसाची असल्याचे तपासात पुढे आले आहे.
वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करताना, सीसीटीव्हीत कैद झालेला हणमंतु पोलिसांच्या नजरेत आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यामध्ये त्याने पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे पाचही दुचाकी वापरून त्याने वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्या होत्या. तपासादरम्यान त्याने ती ठिकाणे पोलिसांना दाखविली. पोलिसांनी 85 हजारांच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दादासो मोरे, पोलीस अंमलदार संदीप जावळे, इम्रान जमादार, विनोद रजपूत, राजकुमार पवार व वसीम शेख यांनी केली.