प्रतिनिधी/ सोलापूर
गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण करणारा सराईत गुन्हेगार सचिन ऊर्फ बॉबी संभाजी शिंदे (वय 41, रा. आवसेवस्ती, अमराई) याच्यावर दुसऱयांदा स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. यापूर्वी 2017 मध्ये त्याच्यावर स्थानबद्धतेची तर 2020 मध्ये तडीपारची कारवाई करण्यात आली होती.
हल्ला करणे, खंडणी मागणे, गंभीर दुखापत, जबरी चोरी, सरकारी, सरकारी नोकरांवर हल्ला करणे तसेच तडीपार आदेशाचा भंग अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून आरोपी सचिन याने मरिआई चौक, आवसेवस्ती आमराई, देगाव रोड, गवळी वस्ती, सरस्वती चौक, मेकॅनिक चौक, रामलाल चौक, गंगानगर, लक्ष्मी चाळ, हब्बू वस्ती, रिलायन्स मार्केट व पार्क चौक या भागात भीती व दहशत निर्माण केली होती.
दरम्यान, सचिन याच्याविरोधात सलगर वस्ती व फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नऊ गंभीर गुह्याची नोंद आहे. गुन्हेगारी कारवायांपासून त्याला परावृत्त करण्यासाठी पोलिसांनी यापूर्वी स्थानबद्ध तसेच तडीपारची कारवाई केलेली आहे. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणतीच सुधारणा झाली नाही. उलट 2022 मध्ये त्याने सरकारी नोकरावर हल्ला केला तसेच तडीपार आदेशाचा भंग केला. यामुळे त्याच्यावर पुन्हा स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी दिले होते. त्याप्रमाणे कारवाई करून सचिन शिंदे यास येरवडा कारागृहात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बिसेंद्रसिंग बायस तसेच तसेच विनायक संगमवर, सुदीप शिंदे, अक्षय जाधव, विशाल नवले यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्या सहकार्याने ही कारवाई केली.
हा ही वाचा : Sangli : मिरजेत गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना अटक