प्रतिनिधी/सोलापूर
शहरातील मुख्य बाजारपेठांत गैरकायद्याची मंडळी जमवून, शस्त्राचा धाक दाखवून खंडणीसारखे अनेक गंभीर गुन्हे करणारा तसेच तडीपार आदेशाचा भंग करणारा सराईत गुन्हेगार विपुल रामदास शिंदे (वय 33, रा. चौपाड, दक्षिण कसबा) याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करून त्याची येरवाडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
नवीपेठ, मेपॅनिक चौक, सरस्वती चौक, नवीवेस पोलीस चौकी, शिंदे चौक, पारस इस्टेट, लकी चौक, दत्त चौक या शहरातील मुख्य बाजारापेठांत आरोपी विपुलने साथीदारांच्या मदतीने व धारदार शस्त्रांच्या सहाय्याने दहशत निर्माण केली आहे. यामुळे व्यापारी कायम भीतीच्या सावटाखाली वावरत असत. त्याने जबरी चोरी, घरफोडी, खून करणे, खुनाचा प्रयत्न, धमकी देणे, मारामारी तसेच विनयभंगाचे गुन्हे केले आहेत. त्याच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सात गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे. त्याच्या गुन्हेगारीला पायबंद घालण्याचा प्रयत्न म्हणून पोलिसांनी 2021 मध्ये तडीपार केले होते. परंतु त्या आदेशाचा भंग करून आरोपी विपुलने गंभीर गुन्हा केला. तत्पूर्वी त्याच्यावर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नसल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने पोलीस आयुक्त डॉ. राजेंद माने यांनी त्याच्यावर स्थानबद्धतेच्या कारवाईचे आदेश दिले.
शहरातील सार्वजनिक शांतता अबाधित राहण्यासाठी अवैध व्यवसाय करणारे, सराईत गुंड तसेच समाजविघातक कृत्य करणाऱया गावगुंडांची यादी शहर पोलिसांकडून तयार करण्यात आली आहे. आगामी काळातील सण-उत्सव तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून गुंडांच्या मुसक्या आवळण्याचे काम प्रभावीपणे सुरू आहे.