ना हरकत प्रमाणपत्रासाठी मागितली 30 हजाराची लाच; वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावे मागितले पैसे
प्रतिनिधी / पंढरपूर
जमीन एनए (NA) करण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तीस हजार रूपयांची लाचेची मागणी करून त्यापैकी पंधरा हजार रूपयांची लाच स्वीकारताना पंढरपूर येथील बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पडकले.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील शेतकऱ्याची जमीन एन ए. करायची असल्याने त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यामुळे त्या शेतकऱ्याने 13 जून रोजी येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडे अर्ज करून पाठपुरावा करीत होते. यावेळी येथील भांडार कारकून या पदावर कार्यरत असणारे चंद्रकांत अभिमन्य टोणपे (वय 58) यांनी त्या शेतकऱ्याकडे 30 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. यामुळे शेतकऱ्याने लाचलुचपत विभागाकडे आपली तक्रार नोंदवली. त्यानंतर मंगळवारी 14 रोजी मागणी केलेल्या रक्कमेतील सुमारे 15 हजार रूपये स्वीकारताना टोणपे यांना येथील ठाकरे चौकामध्ये रंगेहात पथकाने पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, प्रमोद पकाले, सल्लीम मुल्ला, उमेश पवार, शाम सुरवसे यांच्यासह इतर अधिकारी यांनी केली.