कुर्डुवाडी प्रतिनिधी
सीआयडी पोलिस असल्याची बतावणी करुन दोघा तोतयांनी वृद्ध दाम्पत्यांना अडवून झडती घेण्याच्या बहाण्याने ६३ हजारांची गळ्यातील सोन्याची चेन लांबवली. या अज्ञातांनी टेंभूर्णीच्या दिशेने धूम ठोकली. ही घटना कुर्डुवाडी येथे पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर टेंभर्णी रोडवरील नेहरुनगरजवळ घडली. आज (१० मे )सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत कांतीलाल बदरे (व. ६४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिसांत अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की येथील एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी कांतीलाल बदरे हे पत्नी संगितासह करमाळा येथे जाण्यासाठी टेंभुर्णी रोडवरुन बसस्थानकाकडे पायी चालत जात होते. त्यावेळी नेहरूनगर जवळ दोन तोतयांनी सीआयडी पोलिस असल्याची बतावणी करुन या वृद्ध दाम्पत्यांना अडवले. ”काल कुर्डुवाडीमध्ये चोरी झाली आहे, तुम्हाला चेक करायचे आहे.” म्हणून त्यांनी कांतीलाल बदरे यांचे खिसे चापचले. यावेळी फिर्यादीने खिशातील रुमाल पाकीट काढून दिले असता, “ते नको तुमच्या गळ्यातील सोन्याची चेन काढा, आणि रूमालात ठेवा” असे सांगितेले.
फिर्यादीने एक ग्रॅम बदाम असलेली २० ग्रॅम सोन्याची चेन स्वतः काढून रुमालात ठेवली. त्यानंतर अज्ञात दोघांनी काळ्या रंगाच्या युनिकॉर्नसारख्या गाडीवरुन टेंभुर्णीच्या दिशेने धूम ठोकली. फिर्यादीने टेंभुर्णी रोडवरील मंगलकार्यालयापर्यंत त्यांचा पाठलाग केला पण ते सापडले नाहीत.
दरम्यान, कुर्डुवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, मारामारी आदी प्रकार वाढले आहे. ही घटना दिवसाढवळ्या घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.