कुर्डुवाडी : प्रतिनिधी
गुजरात मध्ये कांदा विक्री करुन एकरकमी कांद्याचे पैसे देतो म्हणून बिटरगाव ता. माढा येथील शेतकऱ्याची ४ लाखांची फसवणूक केली असल्याबाबत कुर्डुवाडी पोलिसांत बिटरगाव ता.माढा येथील शेतकरी रंजेश विठ्ठल वाकसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अण्णासाहेब मोहन जगताप व प्रियंका अण्णासाहेब जगताप दोघे रा. मुंगशी ता. माढा यांच्यावर कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दि.४ ऑगस्ट २०२१ रोजी पासून आजपर्यंत बिटरगाव ता. माढा येथील फिर्यादी शेतकरी रंजेश विठ्ठल वाकसे यांच्या २४० गोण्यामधील २३४ क्विंटल कांदा गुजरात मध्ये विक्री करतो व एकरकमी ४ लाख २१ हजार रुपये देतो असे सांगून अण्णासाहेब मोहन जगताप, प्रियंका अण्णासाहेब जगताप दोघे रा. मुंगशी ता. माढा यांनी घेतला त्यापैकी ३ लाख ९९ हजार ९५० रु फिर्यादीला न देता फसवणूक करुन विश्वासघात केला. याबाबत फिर्यादीने अण्णासाहेब जगताप यांच्या पत्नी प्रियंका अण्णासाहेब जगताप यांच्याकडे मुंगशी येथे जाऊन त्यांचे पती विषयी चौकशी करून कांद्याच्या पैसा बाबत विचारणा केली असता प्रियंका यांनी तुमचे पैसे आम्ही देणार नाही तुम्ही काय करायचे ते करा. तुम्ही तक्रार केली तर आम्ही तुमचे बघून घेऊ अशी दमदाटी केली. पैसे देण्यास व तिचे पती कोठे आहेत हे सांगणे बाबत टाळाटाळ केली.