कुर्डुवाडी / प्रतिनिधी
माढा पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकाऱ्यास अकाउंट नंबर दुरुस्तीकरिता अवघ्या ५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. संदीप रामदास गावडे वय ४५ असे या पकडण्यात आलेल्या कृषी विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई गुरुवार दि.२ रोजी पं.समिती कार्यालयात झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की यातील तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे जिल्हा परिषद सेस डी.बी.टी योजनेअंतर्गत कडबाकुट्टी मशीन अनुदान मिळण्याकरीता पंचायत समिती कृषीविभाग येथे अर्ज सादर केला होता. त्याचा पाठपुरावा करत असताना कृषी विस्तार अधिकारी संदीप रामदास गावडे, यांनी सदर अर्जामधील बँक अकाउंट नंबर चुकला असल्याचे सांगून सदर अकाउंट नंबर दुरुस्ती करण्याकरिता १०००/- रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ५००/- रुपयायवर काम करून देण्याचे मान्य केले. त्यानंतर लाचलूचपतच्या अधिकाऱ्यांनी रचलेल्या सापळ्यात गावडे रक्कम स्वीकारताना कुर्डुवाडी पंचायत समितीच्या कार्यालयात रंगेहाथ सापडले. याबाबत कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत चालू होती. ही कारवाई एसीबी, सोलापुर यांच्या पथकाने केली.