कुर्डुवाडी/प्रतिनिधी
रिधोरे (ता. माढा) येथील पत्र्याच्या गाळ्यात असणारे एटीएम मशीन गॅसकटरच्या सहाय्याने तोडून त्यामधील २ लाख ७ हजारांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली. याबाबत भारत दिगंबर गायकवाड रा.रिधोरे ता.माढा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गायकवाड यांचे रिधोरे स्टँडवर १३ पत्र्यांचे गाळे असून त्यामधील पाच नंबरच्या गाळ्यात फिर्यादीने स्वतः खासगी हिताची कंपनीकडे डिपाॅझिट भरून एटीएम मशीन चालू केले आहे. सदरचे एटीएम सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू असते.फिर्यादी स्वतः डिसीसी बँके रिधोरे येथून पैसे काढून एटीएम मशीनमध्ये भरणा करतात. शुक्रवार दि २० मे रोजी एटीएम मशीनमध्ये १ लाख ५३ हजार ७०० रुपये शिल्लक असल्याने फिर्यादीने त्यामध्ये ३ लाख ४० हजार अधिक भरणा केला होता.
सोमवार दि.२३ मे रोजी नेहमीप्रमाणे फिर्यादीने रात्री ११.३० वा एटीएम मशीन बंद करताना त्यामधील रक्कम मोजली असता २ लाख ७ हजार रुपये शिल्लक होते. दुसऱ्यादिवशी मंगळवार दि.२४ रोजी पहाटे चार वाजता फिर्यादीच्या गाळ्यातील गाळेधारकाने फिर्यादीला एटीएम मशिनच्या गाळ्याला आग लागल्याचे सांगितले. त्यावेळी फिर्यादीने घटनास्थळावर येऊन पाहिले असता, एटीएम मशिनच्या मागील खोलीचा पत्रा गॅसकटरच्या सहाय्याने कापून अज्ञात चोरट्याने आतमध्ये प्रवेश करुन सीसीटीव्ही कॅमेरा हलवून एटीएम मशिनचा समोरील पत्रा गॅसकटरच्या सहाय्याने कट करुन आतील २ लाख ७ हजारांची रोख रक्कम लंपास केली होती. पुढील तपास पोसई हनुमंत वाघमारे हे करीत आहेत.