कुर्डुवाडी/प्रतिनिधी
कव्हे ता. माढा हद्दीत शुक्रवारी सायं. ८ वा. सुमारास शेतकऱ्याला उसाच्या शेतामध्ये बिबट्या हालचाल करताना दिसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत बिबट्याची माहिती मिळताच वनाधिकारी, वनरक्षक व वनपाल यांनी आज शनिवारी परिसराची पाहणी केली. परिसरात चार वन सेवक बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले असल्याचे वनरक्षक सुरेश कुर्ले यांनी सांगितले.
कव्हे ता.माढा येथील सीना माढा बोगद्याच्या कॅनल लगत विलास मरीबा थोरात हे आई सोबत उसाच्या शेतामधील बोरची पाईप काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी उसाच्या शेतामध्ये काहीतरी हालचाल झाल्याचा आवाज विलास थोरात यांना आल्याने त्यांनी लगेच मोटरसायकल चालू करून हालचालीच्या आवाजाच्या दिशेने गाडीचा लाईट रोखला त्यावेळी त्या ठिकाणी बिबट्या असल्याचे त्यांना निदर्शनास आले. सदर परिसरात बिबट्या असल्याची माहिती वनअधिकारी यांना मिळताच वनपरिमंडल अधिकारी सागर जवळगे, वनरक्षक सुनील थोरात, वनरक्षक बापू वाघमोडे, वनरक्षक जगताप यांनी परिसराची पाहणी केली. मात्र वनअधिकाऱ्यांना बिबट्याच्या पाऊलखुणा मिळून आल्या नाहीत. मात्र नागरिकांच्या सांगण्यावरून बिबटे असल्याची चर्चा आहे.
करमाळा तालुक्यात सहा महिन्यांपूर्वी बिबट्या आढळला होता. बिबट्या पकडण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम आखली होती. यानंतर शुक्रवारी माढा तालुक्यात बिबट्या दिसून आला आहे. अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील जंगल तोड झाल्यामुळे बिबट्या ऊस व केळीच्या शेतात राहणे पसंत करीत आहे. त्यामुळे या परिसरात वारंवार बिबट्या असल्याचे चर्चा होताना दिसत आहे.
कव्हे परिसरात बिबट्या दिसल्याचे नागरिक सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर बिबट्याच्या पाऊल खुणा दिसून आल्या नाहीत. वन सेवक त्या ठिकाणी पाहण्यासाठी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत. दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल. नागरिकांनी रात्रीच्या वेळेस बाहेर पडू नये असे आवाहन वन रक्षक सुरेश कुर्ले यांनी केले आहे.