मारोळी / प्रतिनिधी
मंगळवेढा येथील शासकीय धान्य गोडाऊनमध्ये मासिक धान्याचे चलन रक्कम भरण्यासाठी स्वतःकरिता २५० व साहेबांसाठी १२०० रुपये असा मासिक हप्ता द्यावा लागेल असे म्हणून १२०० रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना अटक करण्यात आली. पुरवठा निरीक्षक उत्तम वामन गायकवाड व संगणक चालक बालाजी सिद्धेश्वर यादव या दोघांना सोलापुर लाचलुचपत विभागाच्या ( Anticorruption Beuro ) पथकाने रंगेहाथ पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान या कारवाईने महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांचे वडर गल्ली, मंगळवेढा येथे स्वस्त धान्य दुकान असून त्यांना प्रत्येक महिन्याला धान्याच्या चलनाची रक्कम तहसिल कार्यालय अंतर्गत असलेल्या शासकिय धान्य गोदाम येथे चलनाव्दारे भरावी लागते. तक्रारदार यांनी माहे मे २०२२ या महिन्याचे मासिक चलन भरण्याच्या अनुषंगाने शासकिय धान्य गोदाम येथील बालाजी यादव यांना भेटले असता यादव यांनी तक्रारदारास चलनाची रक्कमे व्यतिरिक्त त्याचे स्वत:साठी २५० रुपये व साहेबांसाठी १२०० रुपये असा मासिक हप्ता दयावा लागेल असे सांगून लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. १२/०५/२०२२. दि २६/०५/२०२२ दरम्यान आरोपीकडे पडताळणी कारवाई करण्यात आली. यादव यांनी वरीलप्रमाणे लाच रकमेची मागणी केली आहे हे सिद्ध झाल्यावर २६ तारखेला आरोपी गायकवाड यांना रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले. रात्री उशिरावरील दोघा आरोपीविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आले.