जनक भोसलेंनी थकित बिलाचा चेअरमन,संचालक मंडळास विचारला जाब; उघड व्यथा मांडल्याने भालके- काळेंच्या समर्थकांकडून शेतकऱ्यांस धक्काबुक्की
पंढरपूर प्रतिनिधी
माझ्या नावावर कारखान्याने 18 लाखांचे कर्ज उचलले आहे. कारखान्याकडे उसाचे बिल व वाहतुकीचे बिल थकित असून सत्ताधारी गटाकडे वारंवार मागणी करूनसुद्धा मागणी पूर्ण झाली नाही. सभासदांनी थकित बिलांबाबत कोणतीच विचारणा केली नाही. तसेच चेअरमन व संचालक मंडळसुध्दा थकित देण्यासंदर्भात बोलले नसून तुम्ही विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल टाकू नका असे म्हणत रोपळे (ता. पंढरपूर) येथील विठ्ठल कारखान्याचे सभासद जनक भोसले यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावल्याने माजी चेअरमन भगीरथ भालके यांच्या विचारविनिमय बैठकीत राडा झाल्याने उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला होता.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, वेणूनगर ता. पंढरपूरची पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. सभासदांशी विचारविनिमय करण्यासाठी कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी पंढरपूर येथील दाते मंगल कार्यालय येथे बैठक बोलवली होती. यावेळी रोपळे (ता. पंढरपूर) येथील विठ्ठल कारखान्याचे सभासद जनक भोसले यांनी चेअरमन व व्यासपीठावरील संचालक मंडळास ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार, ठेकेदार व कर्मचारी यांची देणी कधी देणार याबाबत विचारले. तुम्ही देणी दिली नाहीत, तुम्ही निवडणुकीत पॅनल टाकू नका असे सांगितल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी जनक भोसले यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करीत धक्काबुक्की केली. मात्र, व्यासपीठावरील नेतेमंडळीच्या मध्यस्थीने पुढचा अनर्थ टळला.
खोडा घातल्याने बिले लांबली
ऊस उत्पादक, वाहतूकदार व ठेकेदार यांची देणी कारखान्याकडे थकित आहेत. देणी भागविण्यासाठी बँकेकडे वारंवार हेलपाटे मारले आहेत. चेअरमन पदाचा मला कमी कालावधी लाभला होता. शेतकऱयांची देणी देण्यासाठी पैसा उपलब्ध होत होता. परंतु काही लोकांनी तिथे जाऊन कट कारस्थान करून खोडा घातल्याने बिले लांबली असल्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी विचारविनिमय बैठकीत कबुल केले.