कुर्डुवाडी : प्रतिनिधी
व्हीआरएल लजिस्टिक लि. या ट्रान्सपोर्ट कंपनीतील चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रान्स्पोर्टचा १ कोटी ३३ लाख ३३ हजार ४२५ रुपयांचा २७ हजार २५० किलो वजनाचा सुपारीमाल नियोजित ठिकाणी न पोहचवता डल्ला मारल्याचे निदर्शनास आले आहे. महिंसगाव, ता. माढा येथे रस्त्याकडेला उभी करुन तो फरार झाला आहे. याबाबत व्हीआरएल लजिस्टिक, लि. हूबळी कंपनीचे सोलापुर येथील असिस्टंट जनरल मॅनेजर केशव अनंतराव हिरासकर सध्या रा. भवानीपेठ, सोलापुर यांनी फिर्याद दिली. त्यावरुन वसंतकुमार एस. नारायणाप्पा रा. बेंगलोर व संतोष चंद्रप्पा एन्नर रा. अंजीमनम, जि. दावणगिरी, कर्नाटक या दोघा चालकांवर कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना मंगळवार दि. १० रोजी दु.२.४० ते रा.११ वा. दरम्यान महिंसगाव ता. माढा येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सदर दोन चालकांनी कंपनीकडे आलेला ट्रान्सपोर्टचा माल अमित एन्टरप्रायझेस, सागर कर्नाटक यांचेकडून २७ हजार २५० किलो वजनाची सुपारी घेऊन रविवार दि.८ रोजी दु.२.४० वा हुबळीहून नोएडा उत्तरप्रदेश येथील धरमपाल सत्यपाल लि. याठिकाणी पोहच करण्यासाठी गाडी ट्रक कंटेनर्स क्र.के ए २५ ए ए ०२५५ घेऊन निघाले होते. दरम्यान हूबळी येथील कंपनीच्या मुख्य कार्यालयातून या गाडीचे जीपीएस लोकेशन पाहिले असता ही गाडी गेल्या १२ तासापासून कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावरील महिंसगाव येथे रोडच्या कडेला उभी असल्याचे दाखवत होते. तसेच यावेळी दोन्ही चालकांचे मोबाइल फोन बंद दिसत होते. याबाबत हुबळी येथून सोलापुरच्या ट्रान्सपोर्ट कार्यालयात फोनवरून संपर्क साधण्यात येऊन चौकशी करण्यास सांगितले. त्यानुसार कंटेनरची पाहणी केली असता कंटेनरच्या दरवाजाचे दोन्ही लॉकसह हिडन लॉक सुद्धा तुटलेले होते व कंटेनरमध्ये असलेला २७ हजार २५० किलो वजनाचा सुमारे १ कोटी ३३ लाख ३३ हजार ४२५ रुपये किमतीचा सुपारीचा माल घेऊन दोन्ही चालकानी पोबारा मारल्याचे दिसून आले.