अक्कलकोट / प्रतिनिधी
अक्कलकोट शहरातील सोलापूर रोडवरील हॉटेल आझाद हिंदच्या पाठीमागे विजेचा धक्का लागून अविवाहित तरुणासह शेळी व गाढवाचा मृत्यू झाला ही घटना सायंकाळी ५ वाजता उघडकीस आली. अंबादास धुळप्पा कोरे वय ३३ रा धनगर गल्ली, बुधवार पेठ अक्कलकोट असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि ६ रोजी सायंकाळी ५ च्या दरम्यान मयत अंबादास धुळप्पा कोरे हा शेळ्या चारण्यासाठी या मोकळ्या जागेत गेला होता. त्याठिकाणाहुन गेलेल्या विजेच्या तारांचा शॉक अंबादास कोरे व त्यांच्या सोबत चरणाऱ्या शेळीसह एका गाढवाला बसला त्यामुळे एकाच वेळी तिघांवर हा जीवघेणा प्रकार घडला.
ही घटना लोकांच्या निदर्शनास आल्यावर विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला व त्यानंतर अंबादास यास अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळी एमएसइबी व पोलीस पथकांनी भेट देऊन पुढील कार्यवाही केली. या घटनेची खबर लिंगप्पा कोरे यांनी दिली. पुढील तपास पोलीस हवालदार राजाराम फुलारी हे करीत आहेत.