अपघातात तिघांचा मृत्यू
प्रतिनिधी/अक्कलकोट
येथील अक्कलकोट ते गाणगापूरकडे जाणाऱ्या रोडवर बुधवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास मौजे बिजगेर (ता अक्कलकोट) शक्करपीर दर्गाजवळ कार व ट्रकच्या धडकेत कारमधील तीन युवकांचा मृत्यू झाला. लग्नाची पत्रिका देवाचरणी अर्पण करण्यासाठी जात असताना नवरदेवांसह त्यांच्या दोन्ही मित्रावर काळाने घाला घातला. दिपक सुभाष बुचडे (वय २९ वर्षे रा. मांरुजी ता. मुळशी जि. पुणे), आकाश ज्ञानेश्वर साखरे (वय २८ वर्षे रा. हिंजवडी ता. मुळशी जि. पुणे), आशुतोष संतोष माने (वय २३ वर्षे रा. वाघोली ता. हवेली जि. पुणे) असे मयत झालेल्या तीघांची नावे आहेत. याची दक्षिण पोलीस ठाणे अक्कलकोट येथे नोंद झाली असून ट्रक ट्रेलर च्या अज्ञात चालकावर गुन्हा दाखल झाला आहे
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास दिपक सुभाष बुचडे हा त्याची लग्न पत्रिका देवाचरणी अर्पण करण्यासाठी त्याचे मित्र आकाश साखरे (रा. हिंजवडी) व आशुतोष माने (रा. वाघोली) यांना सोबत घेऊन कार क्रमांक एच.एच.१४ जे एक्स ७८७८ या वाहनाने पुणे येथून तुळजापुर मार्गे अवकलकोट ते गाणगापूर जात असताना मौजे बिजगेंर गावाचे शिवारातील शक्करपीर दर्गाजवळील अक्कलकोट ते गाणगापूर जाणारे रोडवर समोरुन अक्कलकोटचे दिशेने येणारा ट्रक ट्रेलर नंबर आर. जे. १४ जीके १७२९ वरिल चालकाने वेगावरील ताबा सुटल्याने भरधाव वेगाने जाऊन कारला समोरुन जोराची धडक दिली. कारमध्ये प्रवास करणारे तीन्ही युवाकांना गंभीर जख्मी करून त्यांना उपचारार्थ दाखल न करता किंवा अपघाताची खबर न देता त्यांनं तेथेच टूक ट्रेलर सोडून पळ काढला. तर पोलिसांनी टूक ट्रेलर नंबर आर जे १४ जीके १७२९ च्या अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
फिर्याद मयताचा चुलत भाऊ चंद्रकांत राघुजी बुचडे (वय ४१ वर्षे रा. मारुंजी ता. मुळशी जि. पुणे) यांनी दिली. घटना स्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, दक्षिण पोलीस स्टेशन पोनि प्रदिप काळे यांनी भेट दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदिप काळे हे करीत आहेत.
मयत दिपक सुभाष बुचडे याचे १८ जून ला लग्न होणार होते. त्याची लग्नपत्रिका तुळजापूर, अक्कलकोट येथे देवाचरणी अर्पण करून मित्रांसह गाणगापूरकडे जात आसताना हा अपघात झाला. दुसरा आकाश ज्ञानेश्वर साखरे याचे दोनच महिन्यापूर्वी लग्न झाले होते. तर तिसरा मयत अविवाहित असल्याची माहिती मिळत आहे.