कुर्डुवाडी/प्रतिनिधी
बसमध्ये चढताना महिला प्रवास्याची पर्सची चेन उघडून अज्ञात चोरट्याने पर्समधील २ लाख ४५ हजारांचे दागिने लांबविले. ही घटना गुरुवार दि.२६ रोजी कुर्डुवाडी बसस्थानकात घडली. याबाबत अमरजा प्रशांत शेटे रा.उस्मानाबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी अमरजा शेटे या आईसह चुलत भावाच्या लग्नासाठी आळंदी, पुणे येथे जाण्यासाठी सकाळी १० वा. सुमारास बार्शीहून माजलगाव- कोल्हापूर बसने कुर्डुवाडी येथे आल्या. कुर्डुवाडी येथून दुसरी वैराग – पुणे (एम एच ०७ सी ७२९९) या बसमध्ये सामानासह चढून पुढच्या प्रवासासाठी निघाल्या. दरम्यान सदर बस पिंपळनेर पर्यंत गेली असता फिर्यादीने घेऊन आणलेले शेंगदाणे खाण्याकरिता पर्स बघितली असता पर्सचा अर्धा भाग उघडा होता. तेंव्हा फिर्यादी अमरजा यांनी पूर्ण पर्स उघडून पाहिली असता त्यांनी पर्समध्ये एका छोट्या लाल पर्समध्ये दागिने ठेवलेली पर्स दिसून आली नाही. दुसऱ्या बॅगा व आजूबाजूला शोध घेतला असता मिळून आली नाही.
त्यामध्ये तीन तोळे वजनाचे १ लाख ५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, एक तोळा वजनाचे ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे नेकलेस, एक तोळा वजनाची ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, चार अंगठ्या एकुण एक तोळा वजनाच्या ३५ हजार रुपये किमतीच्या, कानातील फुले, वेले नाकातील नथ एकूण एक तोळा वजनाचे ३५ हजार रुपये किमतीचे असा एकूण २ लाख ४५ हजारांचे दागिने अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन लांबविले. कुर्डुवाडी बसस्थानकात अशा प्रकारच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.