गरम पाण्यातून तीन तासांपूर्वी दिल्या होत्या झोपेच्या गोळ्या; दोन महिन्यांपूर्वी खरेदी केला चाकू अन् दोरी-तीन दिवसांपूर्वी झोपेच्या गोळ्या घेतल्या विकत; खुनाचा बनाव करणारी पत्नीच ठरली मारेकरी
सोलापूर / प्रतिनिधी
आठ वर्षांपासूनच्या प्रेमाला अडथळा ठरणाऱ्या पतीला संपविण्यासाठी पत्नीने अन् तिच्या प्रियकराने दोन महिन्यांपूर्वी चाकू आणि दोरी खरेदी केला. दोन महिन्यांपासून पतीला संपविण्याचा कट करणाऱ्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने बुधवारी मध्यरात्री संधी साधली. पत्नीने पतीचे डोके हाताने घट्ट धरले व प्रियकराने गळ्यावर चाकू फिरविला. झोपेच्या गोळ्या दिल्याने झोपेच्या तंद्रीत असलेल्या पतीला कायमचे झोपवले. त्यानंतर पतीच्या खुनाचा बनाव करून सहीसलामत सुटण्याचा तिचा प्रयत्न चाणाक्ष शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हाणून पाडत 24 तासांच्या आत दोघांना बेड्य़ा ठोकल्या.
अरुणा दशरथ नारायणकर (वय 29, रा. केकडे नगर) व बाबासो जालिंदर बाळशंकर (वय 27, रा. डोंबर जवळगा, ता. अक्कलकोट) अशी खुनाच्या गुह्यात अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. बुधवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास केकडे नगरात तरुणाचा घरात घुसून चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली. मृताच्या पत्नीने अनोळखी व्यक्तीने खून केल्याची फिर्याद पोलिसात दिली. उलट पती मटका व्यवसायाशी निगडित होता, यातूनच घातपात झाला असावा असा संशयही तिने व्यक्त केला होता. परंतु तपास करणाऱ्या चाणाक्ष पथकाला घटनास्थळ आणि मिळालेल्या माहितीवरून फिर्यादी अरुणावर संशय बळावला. पोलिसांनी अधिक खोलवर केलेल्या तपासात तिचे प्रेमप्रकरण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
दरम्यान, घटनेच्या ठिकाणावर असलेली दुचाकी पहाटे गायब झाली होती. यामुळे पोलिसांच्या संशयात आणखी भर पडली. पोलिसांनी फिर्यादीच्या गावात केलेल्या चौकशीतून तिच्या प्रियकराची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी नातेवाईकाच्या वस्तीवर लपून बसलेला अरुणाचा प्रियकर बाबासोला ताब्यात घेतले. त्याने प्रेमप्रकरणातून अरुणाच्या मदतीने दशरथचा खून केल्याची कबुली पथकाला दिली होती. ही बाब अरुणाला माहीत नसल्याने अरुणाने यास दुजोरा न देता उलट प्रियकरालाच ओळखत नसल्याचे सांगितले. पोलिसांनी तांत्रिक पुरावा समोर ठेवताच अरुणाचा पोपट झाला अन् अरुणाने दोघांनी कट रचून पतीला संपविल्याचा गुन्हा कबुल केला.
दरम्यान कटाची अंमलबजावणी करण्यासाठी दशरथ गावातून रात्री 11.30 च्या निघून मध्यरात्री 2.38 मिनिटांनी अरुणाच्या घरी पोहचला. तेव्हा ठरल्याप्रमाणे अरुणाने घराचे दार उघडे ठेवले होते. यानंतर किचनमध्ये झोपलेल्या दशरथचे डोके अरुणाने दाबून धरले व बाबासोने गळ्यावर वार केले. दशरथने प्रतिकार करण्याच्या केलेल्या प्रयत्नात अरुणाच्या गळ्यावर ओरखडले तर बाबासोच्या डाव्या हाताच्या अंगठय़ाला जखम झाली. घटनेनंतर पळून गेलेल्या बाबासोने पहाटे पाचच्या सुमारास येऊन दुचाकी नेल्याची माहिती तपासात समोर आली.
पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय क्षीरसागर, पोलीस अंमलदार महेश शिंदे, कृष्णात कोळी, राजू मुदगल, कुमार शेळके, निलोफर तांबोळी, प्रकाश गायकवाड, वसीम शेख, प्रवीण शेळकंदे यांनी ही कामगिरी केली.
बाबासोच्या छातीवर ‘अरुणा’ हीच नावं
चालक असलेला प्रियकर बाबासो यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची चौकशी करताना गुह्याशी संबंधित अनेक गोष्टींचा उलगडा झाला. त्यात महत्त्वाची एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे बाबासोच्या छातीवर अरुणाचे नाव गोंदलं होतं. हे नाव माझं नाही, दुसऱ्याच कोणाचे तरी असल्याचे सांगणाऱ्या अरुणाने अखेर पतीला संपविण्यासाठी केलेल्या कर्मकहाणीचा पाढा पोलिसांसमोर वाचला.