केतकी, भिलेनंतर दोणवलीत तिसरी घटना
चिपळूण : ग्रामीण भागातील रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या सौरऊर्जेच्या बॅटऱ्या चोरीचे नवे सत्र सुरु झाले आहे. आतापर्यंत लागोपाठ केतकी व भिलेनंतर दोणवली येथे तिसरी घटना घडली आहे. यापूर्वी केतकी येथे बॅटऱ्या चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केतकी-भुवडवाडी येथे सौरऊर्जा बॅटरी चोरीची घटना घडली होती. पोलिसांच्या तपासाअंती या प्रकरणी किशोर पांडुरंग सावंत, सलीम युसूफ शाह या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भिले-सुतारवाडी येथेही चोरट्याने सौरऊर्जा बॅटऱ्या चोरल्याची घटना घडली असून केतकी व भिले येथे एकाच दिवशी हा चोरीचा प्रकार घडला आहे. असे असतानाच तिसरा सौरऊर्जा बॅटरी चोरीचा प्रकार दोणवलीत उघडकीस आला. दोणवली-पवारवाडी येथे शाळेजवळ तसेच बौध्दवाडी एसटी थांबा अशा दोन ठिकाणी 10 हजार रूपये किंमतीच्या सौरऊर्जा बॅटऱ्या चोरट्याने चोरुन नेल्या आहेत. 27 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत ही घटना घडली. या बाबतची फिर्याद मंदार मधुकर चांदिवडे (36, दोणवली शिर्केवाडी) यांनी दिली. सौरऊर्जा बॅटरी चोरीच्या सत्रामुळे ग्रामीण भागात काहीशी खळबळ उडाली असून बॅटऱ्या चोरी हा चर्चेचा विषय बनला आहे.