उत्तर सिक्कीममध्ये हिमस्खलन मॉनिटरिंग रडार कार्यरत
सिक्कीम / वृत्तसंस्था
सिक्कीम हा भारताच्या ईशान्येकडील राज्यातील एक पर्वतीय प्रदेश आहे. येथे हिवाळय़ात बऱयाचदा हिमस्खलन होत असल्यामुळे सीमेवर सुरक्षेसाठी तैनात असलेले जवानही हिमस्खलनाच्या तडाख्यात येतात. मात्र आता ते टाळण्यासाठी लष्कराने सुसज्जता केली आहे. भारतीय लष्कराने उत्तर सिक्कीममध्ये पहिले हिमस्खलन मॉनिटरिंग रडार स्थापित केले आहे. हे मॉनिटरिंग रडार हिमस्खलन येण्याच्या अगदी 3 सेकंद आधी अलर्ट देणार असल्याने जवानांना दक्ष राहणे सुकर होणार आहे.
हिमस्खलन मॉनिटरिंग रडार भारतीय लष्कर आणि संरक्षण जिओ इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च एस्टॅब्लिशमेंट यांनी संयुक्तपणे स्थापित केले आहे. ही यंत्रणा 15,000 फूट उंचीवर असलेल्या लष्कराच्या चौकीवर बसवण्यात आली आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच रडार असून तो हिमस्खलन होण्याच्या अगदी तीन सेकंद आधी त्याची माहिती देईल. हिमस्खलन मॉनिटरिंग रडार बसवून जीवित आणि मालमत्तेची हानी टाळता येईल, असा विश्वास लष्करी अधिकाऱयांकडून व्यक्त करण्यात आला. टप्प्याटप्प्याने ही सुविधा अन्य धोक्याच्या ठिकाणीही कार्यरत केली जाणार आहे.
प्रभावी तंत्रज्ञानामुळे जीवितहानी टळणार
हिमस्खलनाचा सहज शोध घेण्यासाठी हिमस्खलन मॉनिटरिंग रडार हे एक प्रभावी तंत्रज्ञान आहे. रडार कोणत्याही हवामानात आणि दिवसाच्या कोणत्याही वेळी कार्य करते. त्याची व्याप्तीक्षमता 5 ते 10 किमीपर्यंत असून मोठय़ा हिमस्खलनांची माहिती एकाच उपकरणाद्वारे व्यापली जाऊ शकते. ही यंत्रणा हिमस्खलन झाल्यास लोकांना सतर्क करते. ही रडार यंत्रणा स्मार्टफोन आणि टॅबलेटवरूनदेखील ऑपरेट केली जाऊ शकते.
सिक्कीममधील हिमस्खलन धोकादायक
यापूर्वी बऱयाचवेळा उत्तर सिक्कीममधून सैनिक हिमस्खलनाच्या तडाख्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. 2020 मध्ये सैनिकांच्या एका गटाला हिमस्खलनाचा तडाखा बसला होता. लष्करी पथकातील 17 ते 18 जवान हिमस्खलनात गाडले गेल्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्याच वषी लुगानाक ला भागात हिमस्खलनात लष्कराचा एक लेफ्टनंट कर्नल आणि एक जवान हुतात्मा झाला होता.